सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तपासणी केंद्रं उभारली आहेत. त्याचाच भाग म्हणून माळशिरस तालुक्यातील सराटी, कूरबावी, धर्मपूरी येथे तपासणी केंद्र उभारून बॅरिकेट्स लावली आहेत. त्याठिकाणी दिवस-रात्र वाहनांची तपासणी केली जात आहे. तपासणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंगदेखील केले जात आहे.
निवडणूक अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी रात्री गस्त घालून तपासणी केंद्राला भेट देत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात वाहनांतून मोठ्या प्रमाणात पैशांची ने आण होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या अधिपत्याखाली तालुकानिहाय स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकामार्फत तालुक्यांच्या हद्दीवर केंद्रं उभारण्यात आली आहेत.
दोन कर्मचारी, एक कॅमेरामन आणि पोलिस याठिकाणी नियुक्त केला आहे. वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत वाहनांमध्ये रोकड अथवा संशयास्पद काही आढळून आलेले नाही. या तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी आणि व्हिडीओ चित्रीकरणाचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिका-यांना दररोज पाठवला जात आहे.