विलास जळकोटकर
सोलापूर: जिद्द आणि चिकाटी जोडीला दुर्दम्य इच्छाशक्तीची जोड असली की अशक्य ते शक्य करण्याची किमया साधते. असंच काहीसं अशिक्षित माता-पित्यांनी चक्क भेळचा गाडा चालवून लेकीचा-लेकांचा सुखी संसार तर उभारलाच शिवाय तिघांना प्राध्यापक, कलाशिक्षक अन् ग्रंथपाल बनवून आयुष्यात अशक्य काहीच नाही असा संदेश वसंत आणि द्वारकाबाई खिलारे दाम्पत्यांनी दिला आहे.
१९७० च्या दशकामध्ये वसंत भाऊराव खिलारे पंढरपूर तालुक्यात चळे येथून रोजीरोटीच्या निमित्ताने सोलापुरात आले. अशोक चौक परिसरामध्ये दोन भाड्याच्या खोल्यामध्ये संसार थाटला. पोटासाठी काहीतरी करायचे म्हणून वसंत खिलारे आणि त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी या परिसरात भेळ तयार करुन विकायची त्यातून मिळणाºया पैशातून गुजराण करायची हा त्यांचा नित्यक्रम बनला. द्वारकाबाईच्या हातच्या खमंग भेळची हळूहळू परिसरात चर्चा होऊ लागली. मग चारचाकी गाड्याद्वारे हा व्यवसाय सुरु झाला. हळूहळू जम बसला. राजू, अंबादास, नितीन ही मुलं शाळा शिकत आई-वडिलांना मदत करु लागली.
कामावरची निष्ठा आणि मुखी गोडवा या बळावरच खिलारे दाम्पत्यांनी आपण शाळेत जाऊ शकलो नाही पण मुलांना अशिक्षित ठेवायचं नाही या भावनेनं त्यांना शाळेपासून वंचित ठेवलं नाही. मोठी मुलगी सुरेखा, त्यानंतर राजू, अंबादास, आणि नितीन यांनी जिद्दीनं आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. हा सारा संसाराचा गाडा केवळ एका भेळगाडीवर सुरु होता. मोठ्या मुलीचं लग्न झालं.
दोन नंबरचे राजू सध्या लोकसेवा हायस्कूलमध्ये लिपिक तर आणि चार नंबरचे नितीन खिलारे हे कलाशिक्षक म्हणून एकाच शाळेत सेवा बजावत आहेत. दोन नंबरच्या अंबादास यांनीही प्रगतीचा टप्पा पार करीत प्राध्यापकाची नोकरी मिळवली. ते सध्या लातूर जिल्ह्यातल्या औसा येथे अध्यापनाचे काम करतात. भाड्याच्या घरात राहणारे खिलारे दाम्पत्य स्वत:च्या मालकीच्या घरामध्ये वास्तव्यास आहेत. भेळ गाडीमुळेच हे सारं साध्य झाल्याची जाणीव सर्वांनाच असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं.
भेळ हीच आमची लक्ष्मी ! आयुष्यात नाही कधी म्हणायचं नाही आणि कोणतंही काम चांगलं-वाईट नसतं ते आपल्या मानण्यावर अवलंबून असतं. मन लावून मेहनत करा या आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणीमुळेच आम्ही भावंडं शिकू शकलो. भेळ गाडीमुळं आमचा संसार फुलला. तीच खरी आमची लक्ष्मी आम्ही मानतो. ३५ वर्षांच्या प्रदीर्घ व्यवसायानंतर गेल्या आठ वर्षांपासून अथक परिश्रम करणारे आमचे आई-वडील प्रसन्न चित्ताने आयुष्य जगताहेत हीच आमच्या दृष्टीनं समाधानाची बाब असल्याची भावना कलाशिक्षक तथा चित्रकार नितीन खिलारे यांनी आपल्या भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.