सांगोला : लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून चोऱ्या रोखण्याच्या मोहिमेत ग्रामपंचायतीने योगदान द्यावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १३ ऑगस्टपासून जाहीर केलेल्या संचारबंदीला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले.
सांगोला तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. १३ ऑगस्टपासून तालुक्यात संचारबंदी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महूद येथील ग्रामस्तरीय समिती, व्यापारी, व्यावसायिक, नागरिक यांच्यासमवेत पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांची बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी काही सूचना केल्या.
या काळात चोऱ्या रोखण्याच्या दृष्टीने गावात मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. गावात काही ठिकाणी भोंग्याची व्यवस्थाही करावी. जागरूक नागरिकांनी गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले.
यावेळी उपसरपंच महादेव येळे, बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य समाधान येडगे, माजी सरपंच दौलत कांबळे, माजी उपसरपंच दिलीप नागणे, राजेंद्र देशमुख, गणेश लवटे, कल्याण लुबाळ, संजय चव्हाण, मंडलाधिकारी दिनेश भडंगे, तलाठी गणेश भुजबळ, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शिंदे, चंद्रकांत सरतापे, पोलीस पाटील प्रभाकर कांबळे, लहू मेटकरी आणि व्यापारी उपस्थित होते.
---
इतर तालुक्यांतून मागवली पोलीस कुमक
संचारबंदी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पोलीस कुमक व भरारी पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद राहणार आहेत. या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे.
-----
फोटो : १० सांगोला
महूद येथे संचारबंदीबाबत ग्रामकृती समिती, व्यावसायिक, नागरिकांच्या बैठकीत संवाद साधताना पोलीस निरीक्षक सुहास जगताप.