सोलापूर : निवडणूक कार्यालयाने ईव्हीएम ठेवलेल्या रामवाडी गाेदाम परिसरातील माेबाईल जॅमर बसवावे. मतमाेजणी पूर्ण हाेईपर्यंत माेबाईल टाॅवर बंद करावेत अशी मागणी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे साेमवारी केली.
साेलापूर लाेकसभा मतदारसंघात काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विरुध्द भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात चुरशीची लढत झाली. चार जूनला निकाल जाहीर हाेणार आहे. मतमाेजणीपूर्वी काॅंग्रेसने केलेल्या मागणीमुळे नव्या चर्चेला ताेंड फुटले आहे. नराेटे म्हणाले, मतदानासाठी वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर, किंवा वायफाय ईत्यादीच्या माध्यमातून छेडछाड ( हँकिंग ) हाेण्याची शक्यता आहे.
याबद्दल लाेकांच्या मनात भीती आहे. निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता रहावी यासाठी निवडणूक आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवणे आवश्यक आहे. हे निवेदन देताना माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, विनोद भोसले, तिरुपती परकीपंडला, सुभाष वाघमारे, नासीर बंगाली आदी उपस्थित होते.