पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मीटाकळी येथील लक्ष्मण शिंदे हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर डॉ. वृषाली पाटील यांनी उपचार केले. मात्र, उपचार करताना त्यांनी शिंदे यांना गायत्री क्लिनिकल लॅबमधून रक्ताच्या काही चाचण्या करण्याबाबत सांगितले. त्यानुसार त्यांनी त्या लॅबमधून रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या. त्यांचा रिपोर्ट म्हणून त्यांना दुसऱ्या माणसाच्या रक्ताचा रिपोर्ट लॅबमधील कर्मचाऱ्यांनी दिला. त्यानुसार शिंदे यांच्यावर उपचार करण्यात आले. ही शिंदे यांना समजल्यावर त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागला होता. असा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’च्या माध्यमातून उघडकीस आला होता.
याची दखल घेत प्रांताधिकारी सचिन ढोले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, डॉ. प्रसन्न भातलंवडे, डाॅ. वाळूजकर यांनी गायत्री क्लिनिकल लॅबची पाहणी केली. त्याचबरोबर गायत्री क्लिनिकल लॅबचालक नानासाहेब देवकर यांची चौकशी केली, तसेच त्यांना सर्व कागदपत्रे आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना दाखवून ती योग्य असल्याबाबतचा आदेश घेऊन यावा. तोपर्यंत लॅब बंद ठेवावी, अशी सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी देवकर यांना दिली आहे.
----
----
गायत्री क्लिनिकल लॅबचालक नानासाहेब देवकर यांची चौकशी करताना प्रांताधिकारी सचिन ढोले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम, डॉ. प्रसन्न भातलंवडे व डॉ. वाळूजकर.