कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत टेंभुर्णी शहरातील कोरोना रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर होती. रुग्णसंख्या लक्षात घेऊन शासनाच्यावतीने येथे दोन कोरोना केअर सेंटर सुरू होते. ही दोन्ही सेंटर हाऊसफुल्ल झाली होती. या काळात या दोन्ही सेंटरसाठी दोन डॉक्टर, एक स्टोअर ऑफिसर व चार कक्षसेवक असे ७ आरोग्य होते; परंतु हे सर्व कंत्राटी पद्धतीने नेमलेले कर्मचारी २ जुलै २०२१ पासून कमी केले आहेत.
सध्या टेंभुर्णी शहर व परिसरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने पूर्वीची दोन्ही कोरोना केअर सेंटर सुरू केली आहेत. त्यातील एका सेंटरमध्ये ४६ रुग्ण तर दुसऱ्या सेंटरमध्ये काही रुग्ण उपचार घेत आहेत. परंतु या दोन्ही सेंटरमध्ये कायमस्वरूपी आरोग्य कर्मचारी नेमलेले नाहीत. दोन्ही सेंटरमधील रुग्णांवर उपचारासाठी टेंभुर्णी, आलेगाव, मोडनिंब , पिंपळनेर व परिते या प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपकेंद्रातील दहिवली, अकोले खुर्द, चांदज, आलेगाव, टाकळी, राझणी, निमगाव (टें) ढवळस, उपळवाटे, तुळशी, अंबड आदी उपकेंद्रातील एक डॉक्टर, एक आरोग्यसेविका व आरोग्यसेवक यांची आळीपाळीने नेमणूक करून वेळ मारून नेली जात आहे.
----
सध्या या सेंटरवर परिते येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत सातपुते हे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत. दोन्ही कोविड केअर सेंटरसाठी पूर्वीप्रमाणेच कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी.
- जयवंत पोळ, ग्रामपंचायत सदस्य, टेंभुर्णी.