सोलापूर : शेतमाल तारण योजनेला शेतकºयांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन राज्यात १०८ बाजार समित्यांमध्ये नव्याने ११० गोडावूनचे बांधकाम सुरू असून येत्या खरीप हंगामासाठी धान्याची साठवणूक करण्यासाठी उपलब्ध होतील अशी माहिती राज्य पणन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
राज्य शासनाची शेतमाल तारण योजना शेतकºयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याने तारण शेतीमाल साठवणूक करण्यासाठी सोय होणे गरजेचे आहे. राज्यातील ३६० पैकी १४० बाजार समित्यांनी यावर्षी शेतमाल तारण योजनेत सहभाग घेतला असून ३ लाख ७५ हजार ७६८ क्विंटल शेतीमाल तारण ठेवला आहे.
८ हजार ९७३ शेतकºयांनी तारण ठेवलेल्या शेतीमालावर शेतकºयांना ७५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ही रक्कम शेतमालाच्या सध्याच्या दराच्या ७५ टक्के इतकी आहे. या रकमेला ६ टक्के व्याज आकारले जात आहे.यावर्षी राज्यभरात पाऊस कमी पडल्याने खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. याचा परिणाम शेतमाल तारण योजनेत शेतीमाल ठेवण्यासाठी पुरेसे धान्य मिळाले नाही. तरीही मागील तीन वर्षे शेतमाल तारण योजनेला मिळणारा प्रतिसाद व तारण शेतीमाल साठवणूक करण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन राज्यभरात ११० गोडावूनचे बांधकाम सुरू आहे.
या गोडावूनचे बांधकाम येत्या खरीप हंगामातील धान्य येईपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही सरव्यवस्थापक शिंदे यांनी सांगितले. या नव्या गोडावूनच्या बांधकामानंतर धान्य साठवण क्षमता ११ लाख क्विंटल करता येईल असे त्यांनी सांगितले.