अरुण बारसकर
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भलताच बोलबाला होता; मात्र थकबाकीमुळे बँक अडचणीत आली ती काही केल्या सावरली नाही म्हणून प्रशासक नेमले. दुरावलेले व नवीन खातेदार जोडण्याचे काम सध्या सुरु केल्याने ठेवीत मोठी वाढ झाली आहे. झालेल्या बदलाबाबत प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.
प्रश्न : बँकेत नक्की काय सुधारणा झाल्या ?उत्तर : मार्च १८ मध्ये ठेवी २३३० कोटी होत्या त्या आॅक्टोबर महिन्यात १९०० कोटींवर आल्या होत्या. मार्च १९ मध्ये ठेवी २७१७ कोटींवर गेल्या. नवीन ७१ हजार ८३७ खातेदार जोडले. सोनेतारण योजना सुरू करून १०० कोटी कर्ज दिले. नागरी बँकांचे व्यवहार जिल्हा बँकेत सुरू झाले. मार्च १८ मध्ये बाहेरचे कर्ज ३८८ कोटी होते ते परतफेड करून ७५ कोटींवर आणले. बिझनेस प्लॅननुसार कर्मचाºयांनी काम केल्याने हे शक्य झाले.
प्रश्न : बिगरशेती थकबाकी वसुलीबाबत धोरण काय?उत्तर : बिगरशेतीच्या कर्जाची वसुली करण्यासाठी थेट कर्जदारांशी संवाद साधला. त्यांना एकरकमी परतफेड योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे तीन-चार संस्थांनी पैसे भरले. बिगरशेती कर्जाचे जवळपास २०२ कोटी वसूल झाले. अन्य थकबाकीदारांच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत अन् वर्षभरात बदलही दिसतील.
प्रश्न : केवळ ठेवी वाढल्याने बँक पूर्वपदावर येईल का?उत्तर : नवीन ७२ हजार खातेदार जोडल्याने व्यवहार वाढला. बंद झालेला नागरी बँकांचा केवळ चार महिन्यात जिल्हा बँकेतून २१६९ कोटी रुपयांचा व्यवहार झाला. सोनेतारण कर्ज योजनेमुळे नवीन कर्जदार जोडला गेला. लहान-लहान उद्योग करणाºयांना कर्ज दिले जाणार असल्याने तत्काळ वसुली होईल व व्यवहार वाढेल, अशा अनेक उपाययोजना करण्याचे नियोजन.
पेट्रोल पंपाचे व्यवहार सुरू जिल्ह्यातील पेट्रोल पंपाचे आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेतून होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सध्या १४ पेट्रोल पंपाचे व्यवहार जिल्हा बँकेतून होत असून दररोज एका पंपाचा दोन लाखांपासून १२ लाखांपर्यंत भरणा आमच्या बँकेत होत आहे. खेड्यापाड्यात लहान-मोठे व्यवसाय करणाºयांना कर्ज देण्यास सुरुवात केली असून त्यातून बँकेला मोठा फायदा मिळेल.
सुरक्षित कर्जावर भर देणार सुरक्षित कर्ज देण्यावर भर राहील, शाखा स्तरावर मायक्रो एटीएम बसविले जातील. संपूर्ण जिल्ह्यातील सर्व प्रकारचे घटक बँकेशी जोडल्याने ठेवी वाढतील व आर्थिक सुधारणा होईल. यातून मार्च २०२० पासून शेतकºयांना पुरेसे कर्ज देण्यात येईल. बँकिंग क्षेत्रातील होणारे बदल स्वीकारुन शेतकºयांची बँक ही ओळख ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील.