सोलापूर : सोलापूरविद्यापीठाच्या वतीने ४ जानेवारी २०१९ रोजी युनायटेड स्टेट्सचा अकथित इतिहास आणि आण्विक ऊर्जा संकल्पना याविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील परमाणु अभ्यासक डॉ. पीटर कुझनिक यांचे यावेळी संशोधनाविषयी सविस्तर मार्गदर्शन लाभणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या कार्यशाळेत प्रामुख्याने आण्विक ऊर्जा व युनायटेड स्टेट्सचा विकास यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. आण्विक ऊर्जा निर्मितीसमोरील आव्हाने हा स्वतंत्र चर्चासत्राचा विषय यामध्ये राहणार आहे. जागतिक स्तरावरील सर्वात प्रगत अशा अमेरिकेचा इतिहास यावेळी उलगडला जाणार आहे. विकासाची प्रक्रिया ही शांतीशी निगडित असते, हेही या चर्चासत्राच्या निमित्ताने अधोरेखित केले जाणार आहे. याच अनुषंगाने या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्य समन्वयक म्हणून विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विकास विभागाचे विशेष कार्यासन अधिकारी प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील हे काम पाहत आहेत. सहसमन्वयक म्हणून डॉ. माया पाटील, डॉ. प्रभाकर कोळेकर तर चर्चासत्र समितीचे सचिव म्हणून डॉ. प्रकाश व्हनकडे हे काम पाहणार आहेत. त्याचबरोबर या परिषदेच्या यशस्वितेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेत विद्यार्थी, अभ्यासक व संशोधकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी केले आहे.