सोलापूर : चिकुनगुन्या, सांधेदुखीने त्रस्त असलेले ग्रामीण भागातील रुग्ण मान्यताप्राप्त पदवी नसलेल्या डॉक्टरांकडे जातात. त्यांच्याकडून प्रामुख्याने अशा आजारांवर सलाईनचा (आयव्ही) मारा मोठ्या प्रमाणात केला जातो़ वास्तविक रुग्णांच्या आजारानुसार सलाईनचे प्रमाण किती द्यावे याला वैद्यकीय क्षेत्रात काही दंडक आहेत. सलाईनमध्ये सोडियम पोटॅशियम असते. त्याचे अधिक प्रमाण झाल्यास थेट किडनीवर परिणाम होतो अशी धक्कादायक माहिती डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ किशोर इंगोले यांनी दिली.
सोलापूर शहर-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, चिकुनगुन्या अशा सांधेदुखीने अनेकांना त्रस्त केले आहे. खासगी, सरकारी अशा रुग्णांची उपचारासाठी वर्दळ वाढली आहे. दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी, भिज पाऊस झाल्यानेही वातावरणातील हा बदल रुग्णांना त्रासदायक ठरु लागला आहे. डेंग्यूच्या आजाराशी सामना करताना अस्थमानी त्रस्त असलेल्या रुग्णांनी काय खबरदारी घ्यावी यावर डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ किशोर इंगोले यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : सध्या हवामान बदलत आहे यावर काय सांगाल ?उत्तर : गेल्या काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन, रात्री कुडकुडणारी थंडी मध्येच ढगाळ वातावरण असा सातत्याने वातावरणामध्ये बदल होत आहे. त्यातच चिकुनगुनिया, सांधेदुखीचे आजार, स्वाईन फ्लूसारखे आजार आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरताहेत. सध्याचा काळ हा मादी डासांना प्रजननासाठी पोषक काळ आहे. डेंग्यूचे विषाणू वेगाने पसरु शकतात. अशावेळी नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आसपास साचलेले डबके निष्काम करावेत.
प्रश्न : साथीच्या आजाराबाबत रूग्णांची काय काळजी घ्यायला हवी ?उत्तर : साथीच्या आजारांमुळे रूग्णांना विविध प्रकारचे आजार उदभवतात़ यातील काही रूग्णांना स्वाईन फ्लूची लागण झालेली असेल तर त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. सरकारी दवाखान्यात या संबंधी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे याचा लाभ घ्यावा.
प्रश्न : साथीचे आजार पसरण्याचे काय कारण ?उत्तर : पावसामुळे साचलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची पैदास वाढते. आपल्या आसपास पाणी साचलेली ही डबके नाहीशी केली पाहिजेत. शिवाय घरातील पाण्याचा साठा आठवड्यातून एकवेळा बदलावा. कोरडा दिवस पाळावा या नित्याच्या बाबींबद्दल शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.
प्रश्न : साथीच्या आजारांबाबत रूग्णांनी काय काळची घ्यायला हवी ?उत्तर : सध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातील हवामान दिवसेंदिवस बदलत आहे. दिवसा असणारे ढगाळ वातावरण पण पाऊस नाही, उदासीन वाटणे, मनामध्ये येणारा नकारात्मक सूर या बाबीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी करणाºया आहेत. अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांकडून सकारात्मता बाळगावी, अशाही सूचना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहेत. व्याधीनी त्रस्त असलेल्या नागरिकांनी प्रथमदर्शनी आजाराची कुणकुण असणारी जाणीव झाल्यास लागलीच दक्षता घ्यावी़ रुग्णांनी अधिकृत पदवी घेतलेल्या डॉक्टरांकडून तपासणी करून निदान करुन घ्यावे. अन्यथा आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो असाही सल्ला इंगोले यांनी दिला आहे.