महेश कुलकर्णी सोलापूर : नोव्हेंबरचा अर्धा महिना सरला तरी आॅक्टोबर हीट कमी झाली नाही. दुसरीकडे हिवाळ्यामुळे रात्री थंडी पडत आहे. पहाटेचे तापमान १४ अंशांपर्यंत आले आहे. दोन ऋतूंच्या या विचित्र संगमामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वेगवेगळ्या ऋतूंच्या संगमामुळे शरीरातील थर्मल बॅलन्स (शरीराच्या तापमानाचा समतोल) बिघडल्याने आजार वाढत असल्याची माहिती सोलापुरातील प्रसिध्द जनरल फिजिशियन डॉ. शार्दुल कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधताना दिली.
गुलाबी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. मात्र थंडीत होणारे आजार कोणालाच नको असतात. जसजशी थंडीची चाहूल लागते तसतसे वातावरणातील बदलही जाणवू लागतो. वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, खोकला, घसादुखी तसेच उष्णतेमुळे ताप, डिहायड्रेशन, डोकेदुखी हे आजाराचे प्रमाण वाढत असल्याचेही डॉ़ कुलकर्णी यांनी सांगितले.
साथीच्या आजारात काही घरगुती उपाय...
- निलगिरी तेलाच्या वासाने सर्दी कमी होते
- हिवाळ्यात जसजसे तापमान घटत जाते तसतसे सर्दी आणि नाकातून पाणी येण्यास सुरुवात होते. यासाठी कापसाच्या बोळ्यावर निलगिरीच्या तेलाचे एक-दोन थेंब टाकून त्याचा वास घेत राहा. असे केल्याने तुम्हाला एक ते दोन दिवसांत नाक वाहण्यापासून आराम तर मिळेलच, पण त्याचबरोबर जर सर्दीमुळे नाक बंद झाले असेल तर त्यापासूनही आराम मिळेल.
हेल्दी फूड खा निरोगी शरीर ठेवा...
- - सध्याच्या मिश्र वातावरणात हेल्दी फूड खाण्यावर भर द्या. आजारांपासून वाचण्यासाठी आहारात प्रोटीनची मात्रा जास्त असेल अशा पदार्थांचेच सेवन करा. फळ, भाज्या, नट्ससारख्या गोष्टींचे सेवन करा. त्याचबरोबर जेवणात अशा गोष्टींचा समावेश करा की, ज्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम (चयापचय क्रिया) वाढेल. त्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही.
- व्यायाम करा शरीर तंदुरूस्त ठेवा
- - आठवड्यातून किमान ५ ते ६ वेळा ३० मिनिटांचा वॉक घ्या किंवा व्यायाम केल्यामुळे शरीरातील तापमान गरम राहील आणि त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.
गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा
- - हिवाळ्यात घसा खवखवणे, ताप येणे यांसारखे आजार वाढीस लागतात. कारण, हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे या समस्या उद्भवतात. अशा वेळी गरम पाणी, गरमागरम सूप प्यायल्याने शरीराला गरमी मिळेल. त्याचबरोबर जर तुम्ही गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास घशाला आराम मिळेल.
कोमट पाण्याने अंघोळ करा
- - थंडीत थंड पाण्याने अंघोळ करण्याची हिंमत खूप कमी जणांमध्ये असते. म्हणूनच खूप जण थंडीमध्ये कडक गरम पाण्याने अंघोळ करतात. पण गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते आणि अंघोळ झाल्यानंतर जास्त थंडी लागते. म्हणूनच जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्यापेक्षा कोमट पाण्याने अंघोळ करा.