संताजी शिंदे
सोलापूर : पोलिसांच्या स्पिकरमधून घोषणा होऊ लागल्यानंतर गर्दीतील सोलापूरकरांना साक्षात्कार झाला, अरे जमावबंदी लागू झालीय. ही चर्चा चौकाचौकात होऊ लागली. जिल्हाधिकारी यांनी दि.१४ मार्च रोजी पासून जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे, मात्र कोरोना व्हायरसचे गांभीर्य नसल्याने प्रशासन आक्रमक झाले आहे.
शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून सध्या जमावबंदीचा आदेश लागू झाला आहे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक कोणत्याही ठिकाणी जमा होणार नाहीत. वृद्ध व लहान मुलांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. विवाह कार्य व इतर सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपले हात वारंवार धुवावेत. कोरोना संदर्भात अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नये. सोशल मीडियातून चुकीचा संदेश प्रसारित करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. दोन माणसांमध्ये शक्यतो एक मीटर अथवा तीन फुटाचे अंतर ठेवावे.
खोकताना व शिंकताना समोर रुमाल धरावा. सर्दी, खोकला व ताप असलेल्या माणसाच्या सान्निध्यात येऊ नका, तसेच तत्काळ अशा इसमाला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला द्या. आपल्या घरासोबत सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा असे आवाहन स्पिकरवरून पोलीस करीत आहेत. शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात पोलीस व्हॅन फिरत आहेत. हॉटेल, चौक, मार्केट, कॅन्टीन आदी ठिकाणी थांबून लोकांना सूचना केल्या जात आहेत. हॉटेलवाल्यांना शक्यतो अन्नपदार्थ हे पार्सल देण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
जमावबंदीची अंमलबजावणी सुरू...- आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम लागू केले आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कलम १४४ नुसार जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दिवसरात्र पोलीस शहरातील सभा, संमेलने, सांस्कृतिक कार्यकम, लग्न आदींवर लक्ष ठेवून आहेत. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत.
पोलीस कर्मचारी, अधिकाºयांना मास्क बंधनकारक...- सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाºयांना दररोज मास्क घालण्याच्या सूचना आयुक्त अंकुश शिंदे यांनी केल्या आहेत. बहुतांश सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी हे सध्या मास्क तोंडाला लावूनच शहरात फिरताना दिसत आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस देखील मास्क लावून गाड्यांची तपासणी करीत आहेत, अंतर ठेवून कारवाई करीत आहेत.