सोलापूर : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा किंवा मुलगी म्हणजे प्रकाश देणारी पणती, असे पारंपरिक शब्द वापरून लिंगभेद न करता आपण आपल्या मुलांना माणूस म्हणून वाढवलं तर नक्कीच त्यांचं जीवन प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
समाजात मुलगा-मुलगी या लिंगभेदाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकमत सखी मंच व स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र संघटना सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवासदन प्रशालेत (वॉक फॉर कॉझ) ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, ‘आपण खूप नशीबवान आहात, कारण तुम्ही या ठिकाणी अस्तित्वात आहात, म्हणून समोर बसलेल्या मुलींनो जीवन खूप सुंदर आहे, त्याचा खºया अर्थानं आस्वाद घ्या अन् आपल्या स्वप्नांना नवे पंख देऊन प्रगती साधा.प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींनी वाचविलं तर पाहिजेच पण त्याचबरोबर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, तर त्या मुलींना त्यांचे असलेले हक्क, त्यांच्याविषयीचे कायदे याचा अभ्यास असेल़ अन ते त्या स्वत:साठी लढू शकतील. मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये. आपल्या घरातून, संस्कारातून याला बळ मिळेल़ जी कामे मुली करतात ते मुलांना करू द्या...जे कामे मुलं करतात ते मुलंींना करू द्या़ मुलगा-मुलगी असा भेदभाव न करताना माणूस म्हणून जगू द्या असा सल्ला मधुरा वेलणकर यांनी यावेळी दिला.
पारंपारिक संस्कृती, रितीरिवाज, चालीरितीत न अडकता आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील जीवन जगा़ आपले जग, देश, राज्य कुठे चाललंय हे पाहत नव्या पिढीने बदल करून घ्यायला हवेत़ जातीयवाद, ध्येयवाद, धार्मिकवाद, राजकीयवाद यातून बाहेर पडण्याची गरज असल्याचेही वेलणकर म्हणाल्या.