सोलापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार राजेंद्र राऊत, महापौर शोभा बनशेट्टी, अॅड. मिलिंद थोबडे यांच्यासह ९५ जणांनी मुलाखती दिल्या. भाजपच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह आघाडीतील इतर इच्छुक उमेदवार या मुलाखतींकडे फिरकले नाहीत. राष्टÑवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी सायंकाळी मंत्री राम शिंदे यांची भेट घेतली.
होटगी रोडवरील एका हॉटेलमध्ये वस्त्रोद्योग व पणनमंत्री प्रा. राम शिंदे, संघटनमंत्री रवी अनासपुरे, माढा लोकसभेचे प्रभारी अविनाश कोळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सकाळी प्रा. शिंदे यांची भेट घेतली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे वडील आजारी असल्याने त्यांनी अनुपस्थित राहणार असल्याचे कळविले होते. म्हाडाचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी बार्शीतून इच्छुक असल्याचे पत्र पाठविले होते. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. मिलिंद थोबडे यांनी सकाळी प्रा. शिंदे यांची भेट घेऊन शहर उत्तरमधून उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली. दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला मुलाखतींना सुरुवात झाली. एक किंवा दोन मिनिटात प्रत्येक उमेदवाराची मुलाखत उरकण्यात येत होती. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मोहोळ आणि माळशिरससाठी तर माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी मोहोळसाठी मुलाखती दिल्या. त्यानंतर संजय क्षीरसागर, धनंजय पाटोळे, शुभांगी क्षीरसागर, नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी मुलाखत दिली.
अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी, आनंद तानवडे, शोभा खेडगी, शिवानंद पाटील, महानंदा तानवडे, मल्लिनाथ स्वामी, गुरसिध्दप्पा परचंडे यांनी तर सांगोल्यातून श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे पाटील, संभाजी आलदर, शिवाजी गायकवाड, चेतनसिंह केदार यांनी मुलाखत दिली.
माळशिरससाठी पुण्यातील नगरसेवक प्रमोद साठे, अजय सकट, अतुल सरतापे, त्रिभुवन धार्इंजे यांनी, माढ्यातून संजय कोकाटे, भारत पाटील, दादा साठे, मीनल साठे, राजकुमार पाटील, संजय पाटील भीमानगरकर, जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी मुलाखत दिली. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, पद्मा काळे यांनीही बराच वेळ थांबून मुलाखत दिली. पंढरपुरातून चंद्रकांत बागल, बी. पी. रोंगे, राजेंद्र सुरवसे, सिद्धेश्वर आवताडे आणि करमाळ्यातून गणेश चिवटे, संजय बसके यांनी मुलाखत दिली. पंढरपूर भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ भाजपकडे घेण्यात यावा, असे निवेदन दिले.
शहरातील कार्यकर्त्यांना मुलाखतींचे ठाऊकच नव्हते!- भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी शहरातील कार्यकर्त्यांना मुलाखत कार्यक्रमाचा निरोप दिला नव्हता, असा आरोप नगरसेवक नागेश वल्याळ, वीरभद्रेश बसवंती, रामचंद्र जन्नू यांनी केला. सोलापुरात भाजपच्या मुलाखती आहेत हे आम्हाला पक्षाकडून नव्हे तर व्हॉट्सअॅपवरून कळाले, असे नागेश वल्याळ म्हणाले. निरोप नसल्याने अनेक इच्छुक लोक मुलाखतीपासून वंचित राहिले. शहराध्यक्षांनी निरोप देण्यात टाळाटाळ का केली, याबद्दल खुलासा करायला हवा, असे बसवंती म्हणाले.
शहर उत्तरचे इच्छुक- सोलापूर दक्षिणसाठी सुभाष देशमुख यांचे नाव चर्चेत राहिले. शहर उत्तरमधून शहर उत्तर-पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार नरसिंग मेंगजी, नगरसेवक नागेश वल्याळ, दत्तात्रय गणपा, नरसिंग मेंगजी, जगदीश पाटील, रामचंद्र जन्नू, वीरभद्रेश बसवंती यांनी मुलाखत दिली. शहर मध्यसाठी नगरसेवक नागेश वल्याळ, माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी मुलाखत दिली. शहर मध्यसाठी लवकरच जाहीर मेळावा घेणार असल्याचे अनंत जाधव यांनी येथेच जाहीर करून टाकले.
बबनदादा, परिचारक, आवताडेही भेटले- भाजपच्या वाटेवर असलेले राष्टÑवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी प्रा. राम शिंदे यांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमदार प्रशांत परिचारक यांनी सकाळी प्रा. शिंदे यांची भेट घेतली. यादरम्यान दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनीही भेट घेतली.