बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी व त्यांच्या संशोधन प्रकल्पाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता २२ व २३ डिसेंबर रोजी बार्शी येथील एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनियरिंग येथे आविष्कार संशोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
गुरुवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता या अविष्कार संशोधन महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्यासह संलग्नित विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनियरिंगचे प्रतिनिधी यांची उपस्थिती असेल.
या अविष्कार संशोधन महोत्सवामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 414 विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून 395 पोस्टरचे यावेळी प्रेझेंटेशन होणार आहे. त्याचबरोबर 19 मॉडेल्सचे देखील सादरीकरण होणार आहे. विद्यार्थ्यांच्या या संशोधन प्रकल्पाच्या परीक्षणासाठी सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील तज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"