बार्शी : संतनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी शेतक-यांनी कर्ज काढून श्री सद्गुरू संतनाथ गृहनिर्माण संस्थेला पैसे दिले; मात्र आता हेच शेतकरी आम्हाला प्लॉट नको, आमचे कर्ज नील करून द्या, अशी मागणी करू लागले आहेत़ या गृहनिर्माण संस्थेच्या व्यवहाराची चौकशी करून आमची फसवणूक झाल्याची तक्रार शेतक-यांनी जिल्हाधिकारी व सहायक निबंधकांकडे केली आहे. या संदर्भातील माहिती तक्रारदार महेश माळी व शेतक-यांनी बार्शीत पत्रकार परिषद दिली़
महेश माळी म्हणाले, या कर्जाची प्रकरणे तयार केल्यावर आमच्या नावावर काढलेल्या कर्जाची रक्कम संतनाथ गृहनिर्माण संस्थेच्या खात्यावर जमा केली. दरम्यान, या विषयांस अनुसरून १५ डिसेंबर २०२० रोजी सहायक निबंधकांनी शेतक-यांच्या तक्रारीवरून श्री सद्गुरू संतनाथ गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गुंड व सचिव भारत भांगे यांच्यासमवेत संबंधित शेतक-यांची बैठक बोलावली होती. यावेळी अध्यक्ष व सचिवांनी संस्थेचे संचालक मंडळाची सभा बोलून तीन दिवसात निर्णय घेऊ, असे लेखी स्वरूपात कळविले होते; मात्र अद्याप ही हे पैसे या संस्थेने भरलेले नाहीत़ बँकेने आम्हा शेतक-यांना जप्तीच्या नोटिसा काढलेल्या आहेत़ त्यामुळे या गृहनिर्माण संस्थेने तत्काळ आमच्या नावावरील कर्ज भरून उतारे नील करून द्यावेत अशी मागणी केली.
कोट ::::::::::::
या कर्जाचा आणि गृहानिर्माण संस्थेचा काही संबंध नाही़ शेतक-यांनी आमच्याकडे पैसे भरले आहेत़ त्या बदल्यात आम्ही त्यांना प्लॉट देण्यास तयार आहोत़ उलट हेच लोक आता आम्हाला प्लॉट नको तर वैयक्तिक शेतीवर काढलेले कर्ज नील करून द्या, अशी चुकीची मागणी करीत आहेत़ आम्ही संस्थेच्या माध्यमातून आजवर १४२ पैकी १०२ सभासदांच्या नावावर प्लॉट करून दिलेले आहेत़ उर्वरित ४० लोकांनादेखील देण्यास तयार आहेत़
- प्रकाश गुंड,
चेअरमन संतनाथ गृहनिर्माण संस्था
कोट ::::::::
अर्जदारांची मागणी आहे की, कर्ज नील करून द्यावे, मात्र त्यांनी गृहनिर्माण संस्थेकडे पैसे भरले असतील तर त्यांना प्लॉट मिळवून देण्यासाठी सहकार विभाग कायद्यानुसार प्रयत्न करील़ आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही़
- अभयकुमार कटके,
सहा़ निबंधक सहकारी संस्था