वडाळा : डॉक्टर कुलकर्णी यांचे मंगळवारी अपहरण करून त्यांना परजिल्ह्यात सोडले. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामपंचायतीच्या वतीने वडाळा गावातील व्यावसायिकांची बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांनी गुन्हेगारांचा तत्काळ तपास लावावा अन्यथा ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सरपंच जितेंद्र साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. वडाळा गावासह उत्तर सोलापूर तालुक्यातील रुग्णांना २४ तास सेवा देणारे डॉ. अनिल कुलकर्णींसारख्या सभ्य माणसाचे अपहरण करून त्यांच्यावर शस्त्राने वार केले. त्यांना परजिल्ह्यात नेऊन आडरानात सोडून दिले. याबाबत उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे; परंतु पुढील तपास पोलीस प्रशासनाने तात्काळ लावून गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यंत्रणेने डॉ. कुलकर्णी यांचे अपहरण केलेल्या गुन्हेगारांचा तपास न लावल्यास रास्तारोको करू अन्यथा ठोस पावले उचलू, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उपसरपंच अनिल माळी, संतोष सुभेदार, किरण कांबळे, प्रभाकर गायकवाड, यशवंत गायकवाड, प्रशांत राजपूत, डॉ. रिस्वडकर, जीवन साठे, मिलिंद साठे, चंद्रकांत साठे, ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे आदी व्यावसायिक उपस्थित होते.