सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज मुंबई येथे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आगामी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितेचे सदस्य अॅड. माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, श्रीमती शंकुतला नडगिरे आदी उपस्थित होते. समितीच्यावतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन पारंपारिक पद्धतीने सत्कारही करण्यात आला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज तसेच अन्य संताच्या पालख्याबरोबर आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूरात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक येतात. पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहेत. मानाच्या दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाले असून त्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो भाविक येण्याची शक्यता गृहित धरून सोलापूर जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी सुरू केली असून काही विभागांच्या तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लाखो वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत.