सोलापूर : महापालिका शाळेतील मुलींची गळती रोखावी, मुलींना शाळेत येण्यासाठी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महापालिका आता प्रत्येक मनपाच्या शाळेतील आठवी, नववीमधील मुलींना सायकल देणार आहे. या उपक्रमांचा शुभारंभ महिला दिनी करण्यात येणार आहे.
सोलापुरात शहरात महापालिकेच्या शेकडो शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे. घट होत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात आता महापालिका प्रशासन विद्यार्थ्यांची संख्या वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रत्येक महापालिका शाळेतील मुलींना सायकल देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २३८ मुलींना सायकल देण्यात येणार आहे. याशिवाय महापालिकेच्या कॅम्प शाळेची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. यासाठीही एका बँकेने मदत केल्याचे सांगितले.
महापालिका शाळेत शिकत असलेल्या मुलींना मोफत सायकल देण्यात येणार आहे. जे विद्यार्थी महापालिकेची शाळा सोडून अन्य शाळेत प्रवेश घेतल्यास देण्यात आलेली सायकल परत जमा करून घेणार आहे. महापालिकेच्या शाळेत सीएसआर फंडातून चांगल्या दर्जाचे बांधरूम, शौचालयाचे बांधकाम होणार आहे. यासाठी शहरातील एका बँकेने मोठी मदत केली आहे. आणखीन सेवा-सुविधा वाढविण्याचा पालिका प्रशासन प्रयत्न करीत असल्याचेही सांगितले.