प्रांताधिकारी सचिन ढोले
पंढरपूर : फेरफार नोदींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार पंढरपूर तालुक्यात महसूल विभागातर्फे विशेष अभियान राबविण्यात आले. यामध्ये तालुक्यातील नोंदणीकृत व अनोंदणीकृत १३०९ नोदींचे निर्गतीकरण केल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
तालुक्यातील प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती व्हावी यासाठी १ ते १० फेब्रुवारी या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात आले होते. पंढरपूर तालुक्यातील नऊ मंडळातील पंढरपूर २१९, भाळवणी १३२, कासेगाव २१०, चळे ६२, करकंब १४८, तुगंत ७७, पुळूज ५६, भंडीशेगाव २६२, पटवर्धन कुरोली १४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
तालुक्यातील नागरिकांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांची जलदगतीने निर्गती होण्यासाठी तसेच फेरफार नोदींसाठी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार विवेक साळुंखे यांनी केले आहे. निकाली नोदींच्या प्रकरणांचे वितरण तहसीलदार विवेक साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.