सराफ दुकान उघडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी हळद गल्लीतील चांदमल ज्वेलर्सवर शनिवारी कारवाई झाली होती. बार्शी शहर पोलिसांनी हे दुकान ३० दिवसांसाठी सील केले, तसेच दुकानदार अमृतलाल चांदमल गुगळे यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला. त्यानंतर रविवारी गुगळे यांनी आरोप केले आहेत.
गुगळे यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मी माझ्या दुकानात मार्च एंडचे काम करीत होतो. दुपारी काही पोलीस आले व दुकान उघडायला लागले. त्यानंतर दमदाटी करून मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थीमार्फत पाच लाखांची मागणी केली. मी पैसे देण्यास इन्कार केला. त्यानंतर माझे दुकान सील केले गेले. याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांना माझ्यावरील अन्यायाची माहिती दिली आहे.
कोट ::::::::::::
या व्यापाऱ्याच्या दोन पुतण्यांविरुद्ध १५ दिवसांपूर्वीच सावकारकीशी संबंधित गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच एका राजकीय कार्यकर्त्याने फेसबुकवर लाइव्ह करीत हे दुकान सुरू असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आमच्या टीमने घटनास्थळी खात्री करून हे दुकान नियमानुसार बंद केले. केवळ पूर्वग्रहदूषित होऊन हे खोटे आरोप केले गेले आहेत. ते गांभीर्याने घेण्यासारखे नाहीत. चारित्र्यहननाबद्दल कायदेशीर कारवाई करू.
- संतोष गिरीगोसावी,
पोलीस निरीक्षक, बार्शी शहर