तानाजी घोरपडे - हुपरी -प्राणीबंदी कायद्याच्या नावाखाली शासनाने दरवेशी समाजाकडून त्यांची उपजिविका चालविण्याचे पारंपरिक साधन असणारी अस्वले हिरावून घेतली आहेत. भरीस भर म्हणून त्यांच्यावर खटलेही दाखल केले. उदरनिर्वाहासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनीही कुळकायद्याने गेल्या. परिणामी, कुटुंबाच्या चरितार्थासाठी या दरवेशी समाजाला मन:स्ताप सोसत दारोदार अस्वलाशिवाय भटकंती करावी लागत आहे. शासनाने दाखल केलेल्या खटल्यामुळे दरवेशींचे जगणेच अवघड होऊन बसले आहे.एकेकाळी राजाश्रय लाभलेल्या दरवेशी समाजाची जगण्यासाठीची परवड थांबविण्यासाठी शासनाने खटले मागे घेऊन अस्वले पाळण्यास पूर्ववत परवानगी द्यावी, राजर्षी शाहू महाराजांनी कसण्यासाठी दिलेली जमीन परत मिळावी, अशी आर्तता रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील बाळासाहेब हुसेन दरवेशी (वय ७०) हे प्रत्येकाजवळ बोलून दाखवत भावनाविवश होऊन अस्वलांबाबत असलेली माया, जिव्हाळा आपल्या कातर स्वरात बोलत अश्रुवाटे मोकळी करीत असतात.टेंबलाई (कोल्हापूर) देवीच्या यात्रेत पाचव्या माळेला राजर्षी शाहू महाराजांची पालखी नेली जात असे. या पालखीच्या मागे अस्वल व वाघांचा खेळ होत असे. वाघ अस्वलाच्या पोषणासाठी राजर्षी शाहू महाराजांनी दरवेशी पाडळी येथे दरवेशी कुटुंबांना शंभर एकर जमीन इनाम दिली होती; पण ही जमीन कुळांनी पुन्हा ताब्यात घेऊन दरवेशींना हाकलून लावल्याने या कुटुंबांची त्यावेळेपासून परवड सुरू आहे. ती अद्यापपर्यंत सुरूच आहे. आमच्या जगण्याचा आधार असणारी अस्वले ही आमची मुले होती. त्यांच्याशिवाय जगताना दु:ख होत आहे. असे सांगत बाबासाहेब दरवेशी यांच्या डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू त्यांच्या भावना सांगून जात होत्या. वार्धक्यामुळे दुसरे कोणतेही काम त्यांना पेलवत नाही. छत्रपती शाहू महाराजांनी उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन कुळकायद्यामध्ये गेली आहे, ती जमीन परत मिळावी यासाठी साकडे घालत आहेत. अस्वले नाहीत, तर निदान जमीन तरी परत मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.एकेकाळी राजाश्रय लाभलेल्या भारतीय लोककलेतील पारंपरिक लोककलाकाराला प्राणीबंदी आदेशामुळे अस्वलाशिवाय पोटाच्या उदरनिर्वाहासाठी दारोदार भटकंती करावी लागत आहे. अस्वल नाही, तर फिरणे जिवाला पटत नाही. ही व्यथा कुणाला सांगून पटतच नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची परवड सुरू असतानाच शासनाने प्राणीबंदी कायद्याखाली दाखल केलेल्या खटल्यामुळे या दरवेशींना हैराण करून सोडले आहे. तसेच त्यांचे जगणेही मुश्कील केले आहे, अशा व्यथा लोकप्रतिनिधींना व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या दरवेशींचा आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे शासनदरबारी त्यांची कोणी दखलही घेतलेली नाही. साप, वानर, हत्ती, उंट, आदींचे खेळ दाखविले जातात. मग अस्वलांच्या खेळावरच का बंदी, असा प्रश्न दरवेशींकडून विचारला जात आहे.
दरवेशी समाजाचे जगणेही बनले अवघड
By admin | Published: December 17, 2014 8:45 PM