सोलापूर : कुंभारी येथील रे नगर घरकुल प्रकल्पातील तीस हजार घरकुलांना एनटीपीसीच्या पाइपलाइन मधून चोवीस तास पाणी पुरवठा होणार असून, जलसंपदा विभाग, एनटीपीसी तसेच रे नगर प्रकल्प यांच्यात मंगळवारी तसा करार झाला आहे. या करारानुसार रे नगरातील दोन लाख नागरिकांना उजनी धरणातून रोज २४ एमएलडी पाणी पुरवठा होणार आहे.
उजनी ते एनटीपीसी प्रकल्पापर्यंत पाइपलाइन आहे. याच पाइपलाइनद्वारे एनटीपीसी रोज २४ एमएलडी पाणी अधिक उपसा करणार आहे. एनटीपीसी ते रे नगर प्रकल्पापर्यंत १८ किलोमीटरची नवीन पाइपलाइन टाकली असून, याच पाइपलाइनद्वारे रे नगरला रोज २४ एमएलडी पाणी पुरवठा होणार आहे. रे नगर वसाहतीमधील माणसी दीडशे लीटर पाणी मिळणार आहे, अशी माहिती रे नगर प्रकल्पाचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.