अकलूज : देशभरात विरोधी वातावरण असताना ते झुगारून माढा लोकसभा मतदार संघातील सर्वच मतदार, कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. असे प्रेम पैसे देऊनसुध्दा मिळत नाही. त्यासाठी आत्मीयता असावी लागते. माळशिरस तालुक्यातील जनतेने तर माझ्या पत्नीपेक्षाही जास्त माझी काळजी घेऊन मला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे काम केले. या सर्वांच्या ऋणातून या जन्मातच काय पुढील जन्मातही उतराई होणे अशक्य असल्याची भावना खा. विजयसिंंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केली. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे खा. विजयसिंंह मोहिते-पाटील यांच्या विजयानिमित्त आज अकलूज शहरामध्ये विजयोत्सव साजरा करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. अकलूज येथील सदुभाऊ चौकातून सुरू झालेल्या मिरवणुकीचे रूपांतर विजयचौक येथे जाहीर सभेमध्ये झाले. यावेळी नंदिनीदेवी मोहिते-पाटील, भाई एस. एम. पाटील, जयसिंंह मोहिते-पाटील, माजी खा. रणजितसिंंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, आ. बबनराव शिंंदे, प्रभाकर घाडगे, शहाजीबापू पाटील, फत्तेसिंंह माने-पाटील, मदनसिंंह मोहिते-पाटील, जि. प. चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, नगरसेविका कविता म्हेत्रे, सभापती तात्यासाहेब मस्के, माजी आ. सदाशिव पोळ, आ. दिपकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, धनाजी साठे, आ. हनुमंत डोळस, संग्रामसिंंह मोहिते-पाटील, अर्जुनसिंंह मोहिते-पाटील उपस्थित होते. निवडणूक प्रचार काळात मी १३ हजार किलोमीटरचा प्रवास केला. जनतेच्या हिताचे अनेक मुद्दे मांडले. यावेळी माझ्यावर अनेकांनी खालच्या पातळीवरून टीका केली. परंतु या भागातील जनतेचे माझ्यावर निस्सीम प्रेम आहे. माझ्यावर झालेल्या टीकेमुळे टीका करणार्यांची मानसिकता लोकांनी ओळखली आणि त्यामुळेच माझी मते वाढून माझ्या विजयाचा मार्ग सोपा झाला. शेतीचे प्रश्न, शेतीच्या पाण्याचे प्रश्न, कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या मुद्यावर विरोधकांनी माझी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी व जनतेने विरोधकांना चोख उत्तर दिले आहे. आता माझ्यापुढे एकच उद्दीष्ट आहे आणि ते म्हणजे माढा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास. मतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वच तालुक्यातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येवून कामाला लागण्याचे आवाहन खा. मोहिते—पाटील यांनी केले.
--------------------------------------
मी शेळी होऊन आलोय: शहाजीबापू माजी आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातून दादांना मताधिक्य न मिळाल्याबद्दल त्यांची जाहीर माफी मागितली. माळशिरस तालुक्यातून जे मताधिक्य मिळाले आहे ते आईच्या प्रेमासारखे आहे. सांगोला तालुक्यात मला ढाण्या वाघ म्हणतात, पण आज मी तुमच्यापुढे शेळी होऊन आलो आहे. कारण जो विजयाचा गुलाल खेळण्याचा मला हक्क नाही तो मी खेळणार नाही. दादांनी जर मला थोडी ताकद दिली तर मी सांगोला तालुक्याचे चित्र बदलून टाकेन असे ते म्हणाले.
---------------------------------
बबनदादांची अपेक्षा करमाळा तालुक्यातून आपण विजयदादांना आघाडी देवू न शकल्याबद्दल विलासराव घुमरे यांनी खंत व्यक्त करताना दादांनी आमचे पालकत्व स्विकारावे अशी मागणी केली. तर माढ्याचे आ. बबनदादा शिंंदे यांनी मोहिते-पाटील व शिंंदे यांच्या पुढील पिढ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची आशा व्यक्त केली.
-------------------------------------