सोलापूर : उळे येथे १९५९ पासून सुरु असलेला सोलापूर-तुळजापूर रस्ता काही जणांनी मुरुम टाकून बंद केला आहे. यामुळे नालेही बंद झाल्याने घरात घाण पाणी येत आहे. याचा रोजच त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याचा विचार करुन प्रश्न सोडवावा अशी मागणी माजी सैनिक ज्ञानोबा साळुंखे यांनी केली. देशाच्या सीमेवर जितका त्रास झाला नाही तितका त्रास गावात होत असल्याची व्यथा त्यांनी सांगितली.
उळे येथे राहणारे ज्ञानोबा साळुंखे हे जिल्हा परिषदेत आले होते. त्यांनी १६ वर्ष देशसेवा केली. निवृत्ती नंतर तो सोलापुरात आले. उळे येथील गावातून जाणारा सोलापूर - तुळजापूर हा जुना रस्ता होता. या रस्त्यावर मुरुम टाकल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. यामुळे ड्रेनेजचे पाणी पाईपामधून घरात पाणी येत आहे. या पाण्यामुळे आई व भाऊ यांना गॅस्ट्रो झाल्याचे त्यांनी सांगितले.
तिथे राहणारे काही लोक गाळे काढण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांनी रस्ता बंद केला आहे. त्यांनी मुरुम कोठून आणला ? रस्ता का बंद केला ? सार्वजनिक शौचालय बंद का केले ? याची चौकशी करण्याची मागणी साळुंखे यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.
"..तर मला मृत्यूदंड द्यावा"
रस्ता बंद केल्याने अनेक अडचणी येत आहेत. शासनाने दखल घ्वावी. पोलिस, प्रशासनाने यावर मार्ग काढावा. संबंधित ठिकाणी येऊन पाहणी करावी अशी मागणी केली. तसेच आपण चुकीचे असेल तर आम्हाला मृत्युदंड द्यावा अशी विनंती त्यांनी केली.