सोलापूर : काही रुग्णालये हाय रिझोल्यूशन कॉम्प्युटराइज्ड टोमोग्राफी (एचआरसीटीद्वारे) ही चाचणी कोविड-१९ निदानासाठी वापरत आहेत. या निदानाच्या आधारे रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळे स्थानिक प्रशासनाला या रुग्णांची माहिती मिळत नाही.या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने एचआरसीटी चाचणीची माहिती पालिका व नगरपालिकांना देणे बंधनकारक करण्याचा आदेश दिला आहे.
आपल्यांना कोरोना झाल्याचे इतरांच्या लक्षात येऊ नये म्हणून काही लोक हे कोरोनाची चाचणी करत नाहीत. डॉक्टरदेखील अशा काही रुग्णांना एचआरसीटी चाचणी करण्याचा सल्ला देतात. या चाचणीच्या अहवालात छातीमध्ये संसर्ग झाल्याचे दिसून येते. त्यानुसार त्या रुग्णावर उपचार करण्यात येतात. या रुग्णांची माहिती प्रशासनास न कळविल्यामुळे संपर्कातील व्यक्तींचा शोध घेता येत नाही.
केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या सूचनांनुसार कोविड-१९ निदानासाठी आरटीपीसीआर / कोविड अँटिजेन प्रयोगशाळा चाचणी अहवाल ग्राह्य धरण्यात येते. एचआरसीटीद्वारे निदान केलेल्या कोविड-१९ रुग्णांची कोविड चाचणी न झाल्यामुळे स्थानिक प्रशासनास अशा रुग्णांची माहिती मिळत नाही. त्यामुळे कोविड-१९ चा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा चाचण्यांची माहिती देण्याचे रुग्णालयांना सक्तीचे केले आहे. एचआरसीटीद्वारे कोविड-१९ चे निदान करत असल्यास अशा रुग्णाचे नाव, संपर्क क्रमांक, पूर्ण पत्ता आदी माहिती डायग्नोसिस सेंटरना द्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक महानगरपालिकेला स्वतंत्र कक्ष सुरू करण्यास सांगण्यात आले आहे.
--------
कोरोनाचे निदान झाल्यास लक्षणानुसार अलगीकरण, विलगीकरण एचआरसीटीद्वारे निदान झालेल्या रुग्णांची माहिती मिळताच महापालिका रुग्णालयांशी संपर्क साधेल. रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केल्याची दक्षता घेईल. या चाचणीत रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे कळताच त्याच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. लक्षणानुसार अलगीकरण, विलगीकरण करण्यात येणार आहे.
*******