१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं; पण तत्पूर्वी ९, १० आणि ११ मे १९३० रोजीच सोलापूर ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झालं. ‘ब्रिटिशांचं राज्य गेलं, गांधींचं राज्य आलं’ असं गृह विभागाच्या पुण्यातील अधिकाऱ्यानं हिंदुस्थान सरकारला कळवूनही टाकलं..हे सारं घडलं हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा श्रीकिसन सारडा अन् हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचं बलिदान अन् शेकडो सोलापूरकर देशभक्तांच्या लढ्यातून..स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच सोलापूरला स्वातंत्र्याची फळं चाखायला दिली. त्यानंतर इंग्रजांनी मार्शल लॉ पुकारला अन् बनावट खटले दाखल करून १२ जानेवारी १९३१ रोजी सोलापूरच्या चार थोर सुपुत्रांना फाशीची शिक्षा दिली.
देशाभिमानी शहर असलेल्या सोलापूरच्या या देदीप्यमान इतिहासाला महात्मा गांधीजींचा मिठाच्या सत्याग्रहाची अन् त्यानंतर गांधीजींच्या अटकेची पार्श्वभूमी आहे. आपल्या महान नेत्याला अटक झाल्याची बातमी ५ मे १९३० रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर काबाडकष्ट करणाऱ्या कामगारांच्या या शहरात संतापाची लाट उसळली. सभा, मिरवणुका आणि निदर्शनं सुरू झाली. आशण्णा इराबत्ती, डॉ. कृ. भी. अंत्रोळीकर, छन्नुसिंह चंदेले, रामभाऊ राजवाडे आणि महाजन वकील यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला. कलेक्टर हेनरी नाईट यांना या सभा पाहून धडकी भरली.
रुपाभवानी मंदिराजवळील ताडीची झाडं युवकांच्या संतापाच्या लक्ष्यस्थानी आली. ही सारी झाडं तोडून टाकली. या घटनेनंतर कलेक्टर नाईट आणि डीएसपी प्लेफेअर यांनी फौजफाट्यासह येऊन ८ ते १० तरुणांना पकडलं; पण त्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली. ही नावं जाहीर करावीत, यासाठी तत्कालीन पुढारी मंडळी अन् पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी आताच्या बलिदान चौकात शंकर शिवदारे हा युवक हातात तिरंगा घेऊन कलेक्टरपर्यंत पोहोचला. शेजारी सार्जंटने शंकरवर गोळी झाडली..भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सोलापूरकराने दिलेलं हे पहिलं बलिदान.
शिवदारेंच्या मृत्यूमुळे जमाव अतिशय संतप्त झाला. ब्रिटिशांच्या पोलिसांनाही जुमानेना; पण त्याचवेळी मल्लप्पा धनशेट्टी यांनी आपल्या एका वाक्यानं जमावाला शांत केलं.. धनशेट्टींचा केवढा हा वचक. ब्रिटिश अधिकारी अन् पोलिसांना हाच वचक सहन झाला नाही. त्यांनी गोळीबाराचा आदेश दिला. एका लहान मुलाला गोळी लागली. त्याच्या डोक्याचे अक्षरश: तुकडे झाले..मग जमाव अधिकच संतप्त झाला. त्यानंतर मंगळवार पेठ पोलीस चौकीवर जमावानं हल्ला केला. ब्रिटिशांची पळता भुई थोडी झाली अन् अवघ्या शहरावर सोलापूरकरांचं राज्य प्रस्थापित झालं. त्यानंतर ब्रिटिश सरकार मात्र खडबडून जागं झालं.
१२ मे १९३० रोजी लष्करानं शहराचा ताबा घेतला. १५ मे रोजी अधिकृतपणे मार्शल लॉ लागू झाला, तो ३० जून १९३० पर्यंत होता. या दरम्यानच मल्लप्पा रेवणसिद्ध धनशेट्टी (वय ३२), श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा (वय ३६), जगन्नाथ भगवान शिंदे (वय २४) आणि ‘गझनफर’ कार अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना ताब्यात घेऊन बनावट पुरावे तयार करून खटला रचण्यात आला. १२ जानेवारी १९३१ रोजी सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात आली. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेचा तो पहिला दिवस होता.
सोलापूरच्या या अभूतपूर्व इतिहासावर व्यं. गो. अंदूरकर. डॉ. य. दि. फडके. प्रा. रमेश परळकर, डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी विपुल लेखन केलं आहे. सोलापूरच्या या थोर वीरांना शब्दांजली ! - रवींद्र देशमुख, मुख्य उपसंपादक, लोकमत, सोलापूर