पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कोणत्याही मोठ्या पक्षाकडून उमेदवारी न मागता थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी दाखल केला आहे. याचबरोबर उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या दिवशी नागेश भोसले यांनी ‘आमचं ठरलं आहे,’ असा गौप्यस्फोट केला. परंतु, कोणासोबत काय ठरलं, हे सांगितलं नाही. यामुळे भोसलेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण कोणाची गेम करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगराध्यक्षांचे पती नागेश भोसले उमेश व प्रशांत परिचारक निकटचे म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये दिवंगत आमदार भारत भालके यांना अप्रत्यक्षरीत्या मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असते. सध्या ते भाजपचे सहकारी म्हणून फिरत आहेत. भाजपकडून समाधान आवताडे व राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित, आप, शेतकरी संघटना व अन्य छोट्या-मोठ्या पक्षांकडून नागेश भोसले यांना उमेदवारी मिळाली असती, मात्र त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
यावर भोसले यांनी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर परिचारकांना उमेदवारी मिळाली नाही. कार्यकर्त्यांनी व जनतेने मी निवडणूक लढवावी, अशी विनंती केली आहे. साधना भोसले या पक्षाशी बांधील आहेत. त्यामुळे त्या त्यांच्याबरोबर आहेत. मी जनतेशी बांधील असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणामुळे भोसले यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण कोणाची शिकार करणार, हे गुलदस्त्यात असल्याची चर्चा पंढरीत सुरु आहे.
पत्नी भाजपात, पुतणी राष्ट्रवादीत तर नागेश भोसले अपक्ष
माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा साधना भोसले या भाजपत सक्रिय आहेत. त्या भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे भोसले यांची पुतणी श्रेया भोसले या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्ष पदावर काम करीत आहेत. त्या सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रीय असतात. त्यामुळे पत्नी भाजपत, पुतणी राष्ट्रवादीत तर नागेश भोसले अपक्ष असे विचित्र चित्र पंढरपूरकरांना पहायला मिळत आहे.
----