नासीर कबीर
करमाळा: सार्वजनिक सण, समारंभ म्हटलं की, बँड पथक आलंच. नवनवीन गाण्याची धून... त्यावर बेहोश होऊन नाचणारी शौकिन मंडळी.. तेवढीच दाद देणारा प्रेक्षक. पण आता सारंच संपलंय. कोरोना नावाच्या राक्षसामुळे सारंच होत्याचं नव्हतं झालंय. हातावरचं पोट असणाºया मंडळींना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. रोजची रोजीरोटी भागवण्यासाठी चिंचा फोडण्याचं काम करावं लागतंय. कधी संपणार हे संकट ही मंडळी विचारत आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने लग्नसमारंभ, यात्रा, उरूस, उत्सव सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, राजकीय उदघाटने, समारंभ,वाढदिवस व मिरवणुका आदी सर्व गर्दीचे कार्यक्रम गेल्या महिनाभरापासून रद्द झाल्याने ब्रास बँड पथकाचा आवाज क्षीण झाला आहे. बँड पथकातील कलाकार बेकार झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयींवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी पोलीस-प्रशासन करीत आहेत. त्याचा परिणाम सर्वच उदयोग घटकांना बसला आहे. त्यातून कलाकार मंडळीही सुटलेली नाहीत. एप्रिल व मे महिना म्हटलं की लग्नसराई, यात्रा, उरूस, उत्सवाचे दिवस पण कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावू नये म्हणून गर्दीच्या कार्यक्रमावर शासनाने बंदी घातली आहे याचा फटका ब्रास बँड पथकातील कलाकारांना बसला आहे.
चैत्री पाडवा झाला की गावोगावी देवीच्या यात्रा सुरू होतात पण यंदा यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. अनेकांनी यंदाच्या एप्रिल, मे महिन्यातील आपल्या मुलामुलींची लग्ने पुढे ढाकलण्याचा निर्णय घेतल्याने बँडवाल्यांना दिलेली सुपारी रद्द केली आहे. उदघाटनांचे कार्यक्रम,सण समारंभ व वाढदिवस साजरा करता येत नसल्याने बँडवाले आर्थिक संकटात सापडले आहेत. कार्यक्रमासाठी अॅडव्हान्स बुकिंग घेतलेले पैसे परत द्यावे लागत आहेत. डीजेवर बंदी आल्यानंतर ब्रास बँड पथकास मागणी होत होती पण कोरोना मुळे धंदाच बंद झाला आहे.
करमाळयातील बँड पथकास राज्यातून मागणी..- करमाळा तालुक्यात गुलाम•भाई दोस्ती ब्रास बँड, न्यू दोस्ती ब्रास बँड, रज्जाक ब्रास बँड, जाकीर ब्रास बँड, इसाक•भाई ब्रास बँ्रड त्याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागात २० ते २५ बँड पाटर्या व बॅन्जो पार्ट्या आहेत. एका ब्रास बँडमध्ये २५ ते ३० कलाकार काम करतात. करमाळयातील बँड पथकाचा नावलौकिक राज्यभर असल्याने शौकीन लोक येथे येऊन त्यांना लग्नसमारंभाची सुपारी देतात. लग्नसराई व यात्रा उत्सावाच्या वेळीच कोरोना विषाणूने थैमान मांडल्याने सर्वच समारंभ रद्द झाले. बँड पथकातील कलाकार बेकार बनले आहेत. त्यांना आता आपली व कुटुंबीयांच्या पोटाची चिंता सतावू लागली आहे.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे सर्वच कार्यक्रमावर बंदी आल्याने आम्हा कलाकारासमोर रोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाउन उठल्यानंतर लगेच लग्न समारंभ होणार नाहीत. आपल्याकडे तिथीनुसारच सर्व कार्यक्रम होतात. उन्हाळयातील एप्रिल, मे लग्नसराईचा महिना तर गेला आता प्रतिक्षा आहे नोव्हेंबर महिन्याची पण तो पर्यंत आम्ही पोट कसे भरायचे मायबाप सरकारने आम्हा कलाकारांना आर्थिक मदत करावी. - लालुमियॉं कुरेशी, मालक गुलामभाई ब्रास बँड पथक,करमाळा