बार्शी : गेल्या वीस वर्षांपासून बार्शी तालुक्याच्या राजकारणात आ़मदार राजेंद्र राऊत विरुध्द दिलीप सोपल अशी लढत प्रत्येक निवडणुकीत पहावयास मिळत आहे. आजवरच्या राजकारणाचा विचार करता शहरात दिलीप सोपलांनी तर ग्रामीण भागात राजेंद्र राऊतांनी आघाडी घेतल्याचा इतिहास आहे. वीस वर्षांपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आ़मदार राजेंद्र राऊत यांनी वर्चस्व अबाधित ठेवले आहे. आता सरपंच निवडीनंतर कोण किती पाण्यात हे स्पष्ट होणार आहे.
सर्वाधिक ग्रामपंचायती राजेंद्र राऊत गटाने जिंकल्या आहेत. त्यासोबत ग्रामीण भागात राजकारण करणाऱ्या परंतु तालुकास्तरावर चर्चेत असणाऱ्या नेत्यांनी आपापल्या गावात विजय मिळवत गावात आपली पत असल्याचे दाखवून दिले आहे़ याला माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य इंद्रजित चिकणे यांची गावे अपवाद आहेत. कारण या दोन्ही गावात त्यांचे पॅनेल पराभूत झाले आहे. तालुक्यात ९४ गावांच्या निवडणुका होत्या. त्यात १६ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या होत्या. तर ७८ गावात निवडणुका झाल्या. यामध्ये बहतांश ग्रामपंचायतीत राऊत गटाची सत्ता आली. त्या खालोखाल सोपल गटांने पाठशिवणीचा खेळ केला़. परंतु, या दोघात मागील वेळेपेक्षा जास्त फरक असल्याचे दिसत आहे.
पंधरा गावात स्थानिक आघाड्या, सर्वपक्षीय आघाड्या यांनी सत्ता मिळविल्या आहेत. या आघाड्यात तालुका पातळीवरील नेत्यांचा विचार न करता गावात तडजोडी केल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायती कोणत्याच पक्षाच्या आहेत असे म्हणता येत नाही़. तरीदेखील दोन्ही नेते या गावांवर दावे करीत आहेत. परंतु सरपंच निवडीनंतर कोणाचे किती सरपंच झाल्यावर तालुक्यात कोणाची आघाडी हे निश्चित होणार आहे़
यंदा मोठ्या गावात सत्ता परिवर्तन झाले असून, तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या पांगरीमध्ये सत्ता खेचून आणण्यात राऊत गटाला यश आले. तर जिल्हा परिषद सदस्य असलेल्या किरण मोरे यांना त्यांच्या गावातील सत्ता राखण्यात अपयश आले. तशीच परिस्थिती पंचायत समिती सदस्य इंद्रजित चिकणे व राजाभाऊ धोत्रे यांची झाली. गूळपोळी व मळेगावात या दोघांना पराभवाचे तोंड पहावे लागले़ भालगावात जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे यांनी सत्ता कायम राखून गावातील वर्चस्व अबाधित राखले. राऊत गटाचे काम पाहणाऱ्या बाबासाहेब मोरे यांनी साकतमध्ये ताकत पणाला लावून बापूसाहेब घोरपडे गटाचा पराभव करून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे़
त्रिशंकूकडे सर्वांचे लक्ष
तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या उपळाई आणि उपळेदूमाला या दोन्ही गावात सध्या राऊत गटाची सत्ता होती़. मात्र, या दोन्ही गावांनी स्पष्ट कौल न दिल्याने सरपंच निवडीच्यावेळीच या ठिकाणी कोणत्या गटाची सत्ता येणार हे कळणार आहे़. मात्र, उपळेदूमाला येथे तीन गटापैकी दोन गट राऊत यांचे समर्थक असल्याचे त्याठिकाणी त्यांचा सरपंच होणार हे जवळपास निश्चित आहे़
अशा झाल्या सत्ता अदलाबदल
या गावातील विद्यमान सत्ता कायम
भातंबरे, बाभुळगाव, नारी, उक्कडगाव, ढोराळे, कांदलगाव, झरेगाव, निंबळक, कळंबवाडी आ, कुसळंब, धसपिंपळगाव, घाणेगाव, नागोबाचीवाडी, बावी, महागाव, अरणगाव, कोरफळे, खांडवी, जामगाव, कासारवाडी, साकत, पांढरी, अलिपूर ,ममदापर आदी गावात राऊत गटांच्या कार्यकर्त्यांनी सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. तर सोपल गटाने गुळपोळी, चारे, गोरमाळे, शेळगाव आर गावात सत्ता राऊत गटाच्या ताब्यातील खेचून आणली़. कळंबावाडी पा, हिंगणी, कासारी, तडवळे, पिंपळवाडी पिंपरी आर आदी गावात सत्ता कायम ठेवली आहे. पिंपरी सा, काटेगाव, चिखर्डे या सोपल गटाची सत्ता असलेल्या गावातील सत्ता राऊत गटाने हिसकावून घेतली आहे़
---
प्रमुख तिघांची गावे बिनविरोध
तालुक्यातील सोळा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या़. यात सोपल गटाचे प्रमुख कार्यकर्ते असलेल्या युवराज काटे यांनी खामगाव, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात यांनी मालवंडी तर पंचायत समिती सदस्य राजाभाऊ चव्हाण यांनी मात्र गावपातळीवर तडतोडी करीत आपापल्या ग्रामपंचायती बिनविरोध केली. गावात शांतता अबाधित ठेवण्याला प्राधान्य दिले़
----