सोलापूर : भाजीपाला खरेदी करत असताना अचानक आवाज येतो..., लोक काय आहे म्हणून पाहतात तर प्रत्यक्षात यमराज आणि सोबत काळा रेडा दिसतो. आश्चर्याने हा काय प्रकार आहे ते पाहत असताना मास्क न घातलेल्या इसमाला पकडतात. मास्क का घातला नाही असा जाब विचारत यमाला सांगून त्याला रेड्यावर बसवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा एकच खळबळ उडते, पकडण्यात आलेला व्यक्ती माफी मागतो. मास्क लावण्याची कबुली देत उठाबशा काढतो, पोलीस सोडून देतात मग तो व्यक्ती सुटकेचा नि:श्वास टाकून निघून जातो. हा प्रकार पाहावयास मिळाला, बाळीवेस येथील कस्तुरबा मार्केटच्या रस्त्यावर.
सकाळी १० वाजता व्यापाºयांनी भाजीपाला विक्रीला सुरुवात केली. लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली, फिजिकल डिस्टन्स ठेवून लोक भाजीपाला घेत होते. तोंडाला मास्क लावा..., सुरक्षित अंतर ठेवा असा आवाज आला. कोण आहे हे पाहण्यासाठी लोकांच्या नजरा वळल्या तेव्हा चक्क काळे कपडे, डोक्यावर सिंग, मोठ्या मिशा पाहिलं की भीती वाटावी अशा अवस्थेतील यमराज रस्त्यावर उभा होता. सोबत काळाकुट्ट मोठा रेडा व त्याच्याही तोंडाला मास्क लावलेला होता. हा काय प्रकार आहे म्हणून पाहत असतानाच यमराज विनाकारण फिरणाºयाला व मास्क तोंडाला न बांधलेल्या लोकांना पकडत होता. ओढत ओढत तो रेड्याजवळ आणत होता. गुन्हे शाखेचे पोलीस संबंधित व्यक्तीला तोंडाला मास्क का लावला नाही असे विचारू लागले. यमराजजी याला रेड्यावर बसवा असे म्हणताच चुकलं माझं मला माफ करा..., पुन्हा असं होणार नाही म्हणत कान पकडू लागला. मास्क तोंडाला लावण्यास भाग पाडून संबंधित व्यक्तीला सोडण्यात आले. अशा पद्धतीने अनेक लोकांना पकडले जात होते.
माईकवरून केले जात होते सावध...- गुन्हे शाखेचे पोलीस माईकवरून लोकांना सावध करीत होते. सावधान कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी तोंडाला मास्क बांधावे. फिजिकल डिस्टन्स ठेवून भाजी खरेदी करावी. एका ठिकाणी जास्त गर्दी करू नये..., अन्यथा यमराज आले आहेत. ते तुम्हाला रेड्यावर बसवून घेऊन जातील अशा सूचना देत होते.
हा प्रकार पाहून तोंडाला लावले मास्क...- यमराजाचे कृत्य पाहून ज्या लोकांनी तोंडाला मास्क बांधले नव्हते त्यांनी लगेच लावले. महिलांनी तोंडावर पदर घेतला. एकदम गर्दी न करता लोक अंतर ठेवून रांगेत उभे राहू लागले.
कोरोनाशी लढण्यासाठी काळजी घेणे हा एकमेव पर्याय सध्या आहे. संसर्ग वाढू नये म्हणून शहर पोलीस आयुक्तालय व महापालिकेच्या वतीने जनजागृती केली जात आहे. असे असतानाही बºयाच ठिकाणी लोकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने यमराज व रेडा ही संकल्पना राबवली जात आहे. -संजय जगताप, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.