शंभूलिंग अकतनाळ
चपळगाव : आजच्या आधुनिक युगात अचूक आणि वेगवान बातम्या मिळविण्यासाठी माणूस हव्या त्या माध्यमांचा वापर करतो. मात्र यास अपवाद ठरतेय अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर हे गाव! होय कारणही तसेच आहे. येथील एका पत्रकाराने आपल्या कल्पकतेतुन चक्क जुन्या पिढीतील रेडिओचे महत्व जाणून समाजाच्या जागरूकतेसाठी चक्क मंदिराच्या ध्वनिक्षेपकावरून रेडिओचा वापर केला आहे. येथील नागरिकांच्या दिवसाची सुरूवातच रेडिओने होते.
गेल्या दोन वर्षांपासून अखंडपणे हा उपक्रम सुरू असून गावातील लोकांना घर बसल्या बातम्या ऐकता येतात.व रोज नाविन्यपूर्ण माहिती लोकांना रोज कानावर पडत आहे.या बातम्यांच्या ऐकवण्याच्या उपक्रमाची दखल प्रसारभारती, दुरदर्शनसह पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे.
कुरनूर गावातील दत्त मंदिराच्या प्रतिष्ठापने दिवशीच मंदिर समितीचे अध्यक्ष मारुती बावडे यांनी एखादा चांगला लोकोपयोगी उपक्रम सुरू करावा म्हणून सहा हजार लोकवस्तीच्या या संपूर्ण गावाला हा उपक्रम देण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार उपाध्यक्ष केशव मोरे, सचिव रवी सलगरे, मंदिराचे पुजारी धोंडीबा धुमाळ यांच्याबरोबर चर्चा करून प्रत्यक्षात हा उपक्रम सुरू केला. हे काम आजतागायत सेवा म्हणून पुजारी करत आहेत. सकाळी सहा वाजता रेडिओ सुरु होतो, सकाळी दिल्ली आकाशवाणीचे राष्ट्रीय बातमीपत्र, सोलापूर दिनांक, भक्ती गीते आणि पुणे आकाशवाणीचे प्रादेशिक बातमीपत्र हे गावकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात असेल किंवा राष्ट्रपतींचे अभिभाषण असेल किंवा गावकऱ्यांसाठी उपयोगी कृषी विषयक कार्यक्रम असेल असे अनेक कार्यक्रम हे गावकऱ्यांना आवर्जून ऐकवले जातात. कोरोना काळात तरी याचा फार मोठा उपयोग गावकऱ्यांना झाला आहे. कोरोना संबंधीची संपूर्ण जनजागृती या मंदिरावरील ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने केली होती.
ही संकल्पना पूर्णत्वास जाण्यासाठी दंतरोग तज्ञ डॉ. विवेक करपे यांचे मोठे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे गावातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध, महिला सुशिक्षित नागरिक या सर्वांना या कार्यक्रमाचा उपयोग होत आहे.या माध्यमातून त्यांच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडत आहे. विशेष म्हणजे एखाद्या दिवशी गावांमध्ये जर दुःखद घटना घडली तर त्यादिवशी मंदिरावरील स्पीकर बंद राहतो.त्यामुळे गावातील सर्व नागरिकांना यातून एक प्रकारे सूचना मिळते की गावामध्ये एखादी दुःखद घटना घडली आहे.हा उपक्रम गेली दोन वर्षे नित्यनेमाने सुरू आहे. हे मंदिर ६५ फूट उंचीचे असल्याने दूरपर्यंत सर्वांना स्पष्टपणे बातम्या ऐकू येतात.
कुरनूर हे गाव उंचीवर असल्याने आजूबाजूच्या चुंगी, बादोले बुद्रुक, मोट्याळ, बावकरवाडी, सिंदखेड या परिसरातील वाड्या-वस्त्यांवरही सकाळच्या वेळी बातम्यांचा आवाज कानावर पडतो. शेतकरीही चालता बोलता शेतात उभा राहून बातम्या ऐकत असतो इतकी सवय आता लोकांना या बातम्यांची झाली आहे.या अनोख्या उपक्रमाची दखल सोलापूरसह पुणे आकाशवाणीनेही घेतली त्यापाठोपाठ दिल्ली आकाशवाणीनेही इंग्लिश आणि हिंदी राष्ट्रीय बातम्यामध्ये या उपक्रमाची दखल घेत ही बातमी संपूर्ण देशभर पसरवली. त्याशिवाय दूरदर्शन डीडी वन राष्ट्रीय तसेच सह्याद्री वाहिनी मुंबईनेही या उपक्रमाची दखल घेत गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले आहे.
सध्या अक्कलकोट तालुक्यात देखील या उपक्रमाची गावागावांमध्ये चर्चा सुरू आहे.
असा उपक्रम सर्व गावांनी सुरू करावा
हा उपक्रम प्रातिनिधिक स्वरूपात आम्हीश्री दत्त मंदिरावर सुरू केला आहे पण अशा प्रकारचा प्रयोग जर प्रत्येक गावांमध्ये झाला तर लोकांना अचूक, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या मिळू शकतील.यासाठी प्रत्येक गावच्या प्रमुखाने पुढाकार घ्यावा आणि संकल्पना राबवावी,अशी आमची इच्छाआहे.
- मारुती बावडे, अध्यक्ष श्री दत्तमंदिर समिती, कुरनूर
बातम्यां ऐकणे रोजची सवय
सुरुवातीला आम्हाला लोक बातम्या ऐकतील की नाही अशी शंका वाटत होती परंतु रोज ह्या गोष्टी कानावर पडत असल्याने आता लोकांना ती रोजची सवय झाली आहे जर एखाद्या वेळी बातम्या नाही लागल्या तर लोकांना चुकल्यासारखे वाटते.
- परशुराम बेडगे, निवृत्त शिक्षक