सोलापूर : आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी एसटी बसमध्ये ठेऊन ३० जूनला पालखी मार्गाने पंढरपूरला येणार आहे़ यामध्ये सहभागी होणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी केली जाणार असून दहा जणांनाच परवानगी मिळणार आहे, पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथकही सोहळ्याबरोबर असणार आहे.
३० जूनला पहाटे सहाच्या सुमारास प्रस्थान ठेवल्यानंतर कापूर ओढ्याजवळ असलेल्या अनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती होईल, यानंतर दुसरी अभंग आरती चिंचोलीत झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाणार आहे. रोटी घाटात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिसºया अभंग आरतीसाठी काही वेळ एसटी बस थांबणार आहे, तेथून हा सोहळा वाखरी येथे दुपारी बाराला पोहचणार आहे. याठिकाणी संतभेट, चौथी अभंग आरती होईल, संस्थानच्यावतीने नैवद्य दाखविण्यात आल्यानंतर पादुका पंढरपुरात सायंकाळी चारच्या सुमारास पोहचणार आहे.
पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे काल्याचे किर्तन होणार असून पादुका नगरप्रदक्षिणा करून पुन्हा श्री संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये नेण्यात येणार आहे.