सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना शरद पवारांनी आता फक्त संघाची हाफ चड्डी घालून मांड्या दाखवू नका असा टोला मोहिते पाटलांना लगावला होता त्यावर विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या विधानवर टीका केली आहे.
दादांच्या मांड्या काढणारे लंगोट बांधून का पळून गेले? असा सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूजच्या सभेत शरद पवारांना विचारला आहे. काही दिवसांपूर्वीच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपाच्या वाटेवर आहे. अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांनी शहरात पदयात्राही काढली होती. राष्ट्रवादीत राहून थेट भाजपाच्या प्रचारसभेत मोहिते पाटील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी नातेपुते येथे झालेल्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर टीकेचं लक्ष्य केलं आहे. जयसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू आहेत.
शरद पवारांच्या या टीकेला उत्तर देताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की, विजयदादांना यंदा माढ्याचे तिकीट पक्के असतानाही शरद पवारांनी उंदीर-मांजराचा खेळ केला. मांजरालाच पकडू अशी भूमिका घेतल्याने लंगोट बांधलेले पळून गेले. दादांची चड्डी काढणाऱ्यांना त्यांच्या मांड्या किती भक्कम आहेत, हे कार्यकर्ते दाखवून देतील असा टोला जयसिंह मोहिते-पाटील यांनी लगावला.
शरद पवारांच्या हाफ चड्डी वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनीही समाचार घेतला होता. पराभव समोर दिसत असल्यामुळेच शरद पवारांचा तोल सुटत चालला आहे. शरद पवार म्हणाले होते, भाजपामध्ये गेल्यात चड्या घालून मांड्या दाखवू नका. पण, इथे तर फुल पॅन्ट आहे. तुम्हीच या चड्डीवाल्यांच्या सपोर्टवर मुख्यमंत्री झाला होता, हे विसरू नका. कारण, येथे 23 तारखेला कोणाच्या चड्डी उतरतील ते समजणार आहे, असे टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला होता.
चड्डीवाल्यांचा सपोर्ट घेऊन मुख्यमंत्री झाला होता, हे विसरु नका; पवारांना मुख्यमंत्र्यांचा टोला