सोलापूर : चौदा वर्षांच्या संघर्षानंतर अखेर सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव लाभले. हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो धनगर समाज बांधव गाड्या भरभरून कार्यक्रमस्थळी आले होते. विद्यापीठाच्या नव्या फलकासमोर ‘जय मल्हार’चा पिवळा ध्वज ज्या कौतुकानं फडकला, तेवढ्याच उत्साहानं गजी नृत्याच्या तालावर धनगर समाज बांधवही सुखावला.
देशप्रेमी लढवय्या म्हणून ज्यांची कीर्ती आज देशाबरोबरच जगात पसरली आहे, त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाप्रमाणे विद्यापीठाचाही नावलौकिक व्हावा, अशी अपेक्षा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तार कार्यक्रमाप्रसंगी सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, आमदार नारायण पाटील, महापौर शोभाताई बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, शेळी व मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर, समता गावडे, नगरसेवक चेतन नरोटे, विजयकुमार हत्तुरे, उत्तम जानकर, प्रा. महेश माने, मोहन डांगरे, माजी महापौर अरुणा वाकसे आदी उपस्थित होते. प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले.
‘यळकोट यळकोट जय मल्हार’ ची घोषणा देऊन सुभाष देशमुख म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या लढवय्या होत्या़ त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत.सूत्रसंचालन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले. कार्यक्रमाला सुरुवात झाली, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे सभामंडपात बसले होते.
पडळकर यांना मंचावर बोलवा, असे म्हणत सुरुवातीला कार्यकर्त्यांनी ओरड केली. विद्यापीठ प्रशासनाच्या हे लक्षात आले. त्यांनी पडळकर यांना मंचावर आमंत्रित केले, मात्र त्यांनी नकार दिला. नगरसेवक चेतन नरोटे हे देखील सभामंडपात होते. कार्यकर्त्यांनी त्यांनाही मंचावर बोलवा, असे म्हटल्यानंतर त्यांनीही नकार दिला. मात्र पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी चेतन नरोटे यांना आवाज देऊन बोलावून घेतले. उद्घाटनप्रसंगी कार्यकर्त्यांनी नेत्यांना मागे टाकत स्वत: पुढे उभे राहत होते. फोटो काढतानाही असा अनुभव नेत्यांना आला. नामविस्तारासाठी नेत्यांचे सहकार्य नाही, त्यामुळे हा मान आमचा आहे, अशी भावना कार्यकर्ते यावेळी बोलून दाखवत होते.
थोडा उशीर झाला, पण न्याय दिला : राम शिंदे- सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेनंतर तत्कालीन महापौर अरुणा वाकसे यांनी महापालिकेत नामविस्ताराचा पहिला ठराव केला. तेव्हापासून अधिकृत लढ्याला सुरूवात झाली. नामविस्ताराला उशीर झाला, मात्र अखेर न्याय मिळाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले राज्य सांभाळताना आदर्शवत कार्य केले़ त्यांचा इतिहास आता विद्यापीठाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचेल, असे मत यावेळी जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
नावाला साजेसा असा निधी मिळावा : जानकर- भविष्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ या नावाला साजेसा निधी देण्यात यावा. गेल्या ७० वर्षांपासून हा समाज सवलती मागत आहे, आता हळूहळू त्याची तरतूद होत आहे, असे मत यावेळी बोलताना पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.