सोलापूर : नाबार्डच्या वतीने जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानांतर्गत ‘जलजागृती’ सुरू असून प्रामुख्याने ऊस पीक असलेल्या गावांमध्ये पाणी बचतीसाठीचे प्रबोधन सुरू असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप झिले यांनी सांगितले.
सोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला असून ५ सप्टेंबरपर्यंत निवडलेल्या १०० गावात हे अभियान चालणार आहे. ऊस क्षेत्र अधिक असलेली गावे या अभियानासाठी निवडली असून या गावात मोबाईल व्हॅनद्वारे जलदूत शेतकºयांशी संवाद साधणार आहे. पाटाणे पाणी दिल्याने वाया जाणारे पाणी, ठिबक व स्प्रिंकलरमुळे वाचणारे पाणी तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळते, यासाठीची माहिती दिली जाणार आहे. जलजागृती अभियानाविषयी या गावातील शेतकºयांच्या प्रतिक्रिया नाबार्डला जलदूत पाठविणार आहे.
कृषी अधिकारी व साखर कारखान्यांची यासाठी मदत घेतली जाणार असून यासाठी कार्यशाळाही घेण्यात आली असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप झिले यांनी सांगितले. या जलजागृती अभियानासाठी सोलापूर, लातूर, वाशीम, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, बीड, अमरावती, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
ठिंबक सिंचनाचा वापर करावा- सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणासह भीमा व सीना या प्रमुख नद्या याशिवाय मध्यम व लघू प्रकल्पामुळे शेतीला पाणी मिळण्याची सुविधा आहे. मुबलक पाणी असलेल्या व भागातील शेतकरी शासन आदेशालाही न जुमानता पिकांना मुबलक पाणी देत आहेत. यामुळेच नाबार्डने पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. अधिकाधिक शेतकºयांनी ठिबकचा वापर करावा, हा यामागचा उद्देश आहे.