उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी नेल्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जनहित संघटनेचे भय्या देशमुख व शेतकरी नेते अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उजनी धरणाच्या यशवंत जलाशयात उतरून शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या काळात जलसमाधी आंदोलन केले होते.
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवूनही आंदोलनकर्त्या कार्यकर्ते पोलिसांना चकवा देऊन पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन चालू केले होते. पोलिसांनी वारंवार विनंती करूनही आंदोलन करते पाण्याबाहेर येत नव्हते. शेवटी पोलिसांना कपड्यांसह पाण्यात उड्या माराव्या लागल्या. आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी तीन-चार बोटीही कार्यकर्त्यांच्या भोवती लावण्यात आल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे व जनहितचे भैया देशमुख यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आंदोलन सुमारे ६ तास चालले होते.
आंदोलनकर्त्यांनी दुपारचे जेवणही पाण्यातच केले.
आम्हाला निवेदन द्यावयाचे नाही. पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक लावा व तसे लेखी पत्र आम्हाला द्या तरच आम्ही पाण्याबाहेर निघू, अशी ताठर भूमिका पाणी बचाव संघर्ष समितीने घेतली होती.
----
या आंदोलनात शिवसेना नेते संजय कोकाटे, भाजपचे सुरेश पाटील, नारायण गायकवाड यांनीही शनिवारी सकाळीच पाण्यात उतरून पाणी बचाव संघर्ष समितीच्या जलसमाधी आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला होता. संजय कोकाटे हे सुमारे दोन तास पाण्यात थांबले होते.
----
ज्यांना मतदारांनी निवडून दिले असा एकही लोकप्रतिनिधी पाणी पळवलेल्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्यास तयार नाही. माध्यमातून आम्ही जनतेबरोबर आहोत असे म्हणत आहेत. ज्यांना जनतेने निवडून दिले त्यांनी विधानसभेत आवाज उठवून रस्त्यावर यावे. पालकमंत्र्यांबरोबर बैठक लावल्याने आंदोलन स्थगित केले आहे. निर्णय न झाल्यास त्यांनी टेलर दाखवले आहे आम्ही त्यांना थेट पिक्चर दाखवू.
- अतुल खुपसे, शेतकरी नेते
----
०२टेंभुर्णी-आंदोलन
आंदोलनकर्त्यांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढताना पोलीस.