१९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध झाले. इंग्लंडसहित दोस्तराष्टÑांची या युद्धात सरशी झाली होती. त्यामुळे ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेत मुजोरी व मस्तवालपणा शिरलेला होता. जगभर पसरलेले ब्रिटिश साम्राज्य अधिक मजबूत व्हावे म्हणून वसाहतीमधील ब्रिटिश प्रशासन अधिक सतर्क होते. या प्रशासनात असणाºया अधिकाºयांची मानसिकता अरेरावी, उद्धट व आक्रमक होती.
इंग्लंडमधील राज्यकर्ते यांनी रौलेट कमिशन नेमले होते. त्यांनी ब्रिटिश सत्ता अधिक मजबूत व्हावी म्हणून कायद्याचे प्रारूप इंग्लंडच्या कायदे मंडळात मांडले होते. त्याला रौलेट अॅक्ट म्हणतात. या रौलेट अॅक्ट कायद्याप्रमाणे कोणालाही विनाचौकशी तुरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होणार होते.
स्वातंत्र्यासाठी भारतात काँग्रेससहित अनेक राजकीय गट-तट कार्यरत होते. या कायद्याने लोकचळवळ दाबली जाणार हे त्यांनी ओळखले होते. अनेकांनी या कायद्याला विरोध केला. काही लोकांनी त्याला ‘काळा कायदा’ म्हटले. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर (पंजाब) गावात सुवर्णमंदिराशेजारी असणाºया जालियनवाला बागेत हजारो स्त्री-पुरुष प्रार्थनेसाठी सभेत जमले होते. या सभेत स्वातंत्र्याचा जयजयकार होत होता. तसेच महात्मा गांधींचाही जयजयकार होत होता.
या बागेत जाण्यासाठी सात ते आठ फुटांची एकमेव चिंचोळी वाट होती. या एकाच मार्गाने लोक आत येत व बाहेरही जात असत. ही वाट जनरल डायर या ब्रिटिश अधिकाºयाने आपल्यासोबत आणलेल्या शिपायांसह अडविली. हा प्रकार पाहून सभेत जमलेले लोक भांबावले. काही जण हताश झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता डायरने आपल्या शिपायांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. काही मिनिटांत त्या बागेत अनेक लोक जमिनीवर पडले. जखमी स्त्री-पुरुषांच्या किंकाळ्यांनी भरून गेली. या हत्याकांडात ३७९ लोक मृत्युमुखी पडले़ सुमारे १२०० पेक्षा अधिक जखमी झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला, जगही हादरले.
नि:शस्त्र व शांततेने एकत्र येणाºया व मैदानात प्रार्थना करणाºया जमावावर अमानुष गोळीबार होण्याची घटना प्रथमच घडली होती. सर्व जगातून निषेध होऊ लागला. ‘ब्रिटिश परंपरेला कलंक लावणारी गोष्ट झाली’ असे चर्चिल म्हणाले. ब्रिटिशांच्या या अत्याचाराचा रवींद्रनाथ टागोरांवर एवढा परिणाम झाला की, ब्रिटिशांनी त्यांना देऊ केलेला ‘नाईट हूड’ ही पदवी त्यांनी परत केली. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्धात ब्रिटिशांच्या शांती व सेवासेनेत दाखल होऊन उपकारक काम केल्यामुळे त्यांना हिंद केसरी (कैसर-ए-हिंद) ही पदवी दिली होती. गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करून ही पदवी ब्रिटिशांना परत केली. महात्मा गांधी म्हणाले, ‘हे राज्य ईश्वराचे नसून, सैतानाचे आहे.’
काँग्रेसने हत्याकांडाची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी जबाबदारी गांधीजींवर सोपविली. गांधीजी अनेक दिवस अमृतसरमध्ये राहिले. अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. हत्याकांड व जुलूम जबरदस्तीचे तपशील एकत्र आले. गांधींच्या शिस्तप्रिय व विधिज्ञ वृत्तीमुळे पाशवी व जुलमी वृत्तीचे स्वरूप संपूर्ण जगाला माहीत झाले.
आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू केली. असहकार आंदोलन, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी, छोडो भारत चळवळ या मार्गाने जनतेचा सहभाग वाढवून साम्राज्यवादाला धक्के दिले जाऊ लागले. या सर्व महासंग्रामात जालियनवाला बागेतील निरपराध व नि:शस्त्र जनतेप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांचा गोळीबारात मृत्यू घडून आला. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. आजचा दिवस त्यांच्या त्यागाचा व समर्पित जीवनाची आठवण करण्याचा आहे. या सर्व हौतात्म्य पत्करणाºया कार्यकर्त्यांना नम्र आदरांजली. या हत्याकांडानंतर बदला घेण्याची भावना भारतीयांच्या मनात निर्माण झाली. सरदार उधमसिंग या तरुणाने १९४० साली जनरल डायर याचा लंडनमध्ये गोळ्या घालून खून केला व भारतीयांच्या मनातील बदला घेण्याची पूर्तता केली.- एस. एस. सलगर(लेखक हे समाजसेवक आहेत)