सोलापूर -: मराठा जातीला कुणबी तत्सम जात घोषित करून सरसकट मराठा जातीचा राज्य ओबीसी यादीत समावेश करावा आणि भूमिहीन मराठ्यांना 02 एकर शेतजमीन द्यावी, या आग्रही मागणीसाठी छत्रपती संभाजी राजे यांचे मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय छावाचे संस्थापक गंगाधर काळकुटे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील आणि मराठा समाज, उत्तर सोलापूर तालुक्याच्यावतीने क्रांती दिनानिमित्त गणपती मंदिर समोर, सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील हिप्परगा येथे रास्ता रोखो/चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
मराठा समाज अन्य जातींच्या तुलनेत शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून खूपच मागे पडलेला असूनही मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतरही मराठ्यांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारने कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही. तसेच मराठ्यांना कोणतेच ठोस असे शासकीय लाभ दिलेले नाहीत. त्यामुळे मराठ्यांच्या मनात सामाजिक विषमता आणि राजसत्तेविषयी प्रचंड चीड व राग असून याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत.
तसेच मराठा जातीला कुणबी तत्सम जात घोषित करून सरसकट मराठा जातीचा राज्य ओबीसी यादीत समावेश करावा आणि भूमिहीन मराठ्यांना 02 एकर शेतजमीन देण्याची मागणी राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी शासनाकडे यापूर्वीही सातत्याने केलेली आहे. परंतु, त्या मागणीलाही राज्य सरकारने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तसेच केंद्र व राज्य शासन मराठ्यांच्या मागण्याबाबत व मराठा आरक्षणाबाबत सातत्याने उदासीन भूमिका घेत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात छावाचे योगेश पवार, तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील, संजय पारवे, गणेश मोरे, विश्वजित चुंगे, विजय ढेपे यांसह समाजातील बांधव व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. तर या आंदोलनाला हिप्परगा गावातील जोशी समाज, लिंगायत समाज, गोसावी समाज, बौध्द समाज, वडार समाज, कोळी समाजातील बांधवांनी उपस्थित राहून सक्रिय पाठींबा दिला.