सोलापूर : शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने २८ नाेव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२० या कालावधीत राज्यभरातून जनप्रबोधन यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या यात्रेत सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करणे, कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत करणे, शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणारे अप्रत्यक्ष कर कमी करणे, शेतीमालाच्याशेती उत्पादनातून तयार होणाऱ्या पक्क्या मालाच्या किमतीची तुलना कच्च्या मालाशी करणे, सी. रंगराजन समितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम आखणे, शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे आदी प्रश्नांबाबत या पंधरवड्यात सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही प्रबोधन यात्रा २८ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी, नेसरी व कुरुकली येथे सभा घेण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी इचलकरंजी, अर्जुनवाडा येथे सभा होईल, १ डिसेंबरला सांगलीत मेळावा, खरशिंग येथे सभा होणार आहे, २ डिसेंबरला इस्लामपूर येथे मेळावा, ३ डिसेंबरला पलूस, कडेगाव-आटपाडी येथे सभा, ४ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा, मेळावे, ६ डिसेंबरला अहमदनगर, ८ डिसेंबरला पुणे, ११ ला सातारा, फलटण, वाठार स्टेशन, वाई सभा, १२ ला कराड येथे सभा घेऊन सातारा येथे यात्रेची सांगता होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस शेतकरी संघटनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.