पंढरपूर (सोलापूर) : जरांगे पाटील यांचे उपोषण हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नव्हते तर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणी साठी आहे. असा मोठा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी आज पंढरपुरात केला. त्यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अनिल परब विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी बुधवारी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, वंशवळ न पाहता सरसकट कुणबी दाखले मिळावे अशी त्यांनी मागणी केली. सामाजिक, आर्थिक मागासले पण सिद्ध झाले पाहिजे. इम्परिकल डाटा जमा झाला पाहिजे. त्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. कुणबी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप ही त्यांनी केला.
सुप्रीम कोर्टाने लवकर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा.सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हे सरकार जात की राहत हे पाहावे लागेल. निवडणुका घ्याव्या लागतील की नवा पर्याय शोधावा लागेल. राष्ट्रवादी मधील फूट हा त्यावरील पर्याय भाजप कडून असू शकतो असे ही परब म्हणाले. सरकार कोसळणार आमदार अपात्रतेबाबत उद्या सुनावणी होणार आहे. यावर १५ दिवसात निर्णय द्यावा. शिंदे गटाचे आमदार अपात्र झाल्यानंतर तोच निर्णय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला देखील लागू होतो. त्यामुळे सरकार कोसळणार असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परबांनी केला.