बार्शी : बार्शी येथील जार वॉटर प्लांटचे कुलूप तोडून चोरट्याने ५८ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. १९ ते २० सप्टेंबर या कालावधीत ही घटना घडली. याबाबत आनंद नंदकिशोर सोमाणी पोलिसांत तक्रार देताच पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
आगळगाव रोडवरील हा वॉटर प्लांट आहे. या दिवशी दिवसभर काम करून जमा झालेली ५८ हजार रुपयांची रोकड मधुकर मोरे या मुनिमाने कार्यालयातील टेबलमध्ये ठेवली होती आणि जाताना कुलूप लावून गेले. सोमवारी सकाळी दुसरा मुनिम विजय कुलकर्णी यांनी गेटचे कुलूप उघडले असता कंपनीच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. याची माहिती वॉटर प्लांटचे मालक आनंद सोमाणी यांना दिली. त्यांनी पाहाणी करताना दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. तपासणी करताना ५८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे दिसले. या प्रकरणी पुढील तपास हवालदार माळी करीत आहेत.
----