सोलापूर : राज्यातील मंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बाेलायला हवे. पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि त्यांचे युवराज देशाच्या वारीवर जातात. रामाकडे जावा किंवा काशीला जावा, तुम्ही जनतेच्या मनातून उतरले आहात, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी येथे केली.
पंचायत समितीच्या समितीच्या दाैऱ्यानिमित्त खाेत सोलापूर शहरात आहेत. खाेत यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अयाेध्या दाैऱ्यावर टीका केली. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. गोंधळ घातला. भाजपवर टीका करताना ज्यांनी राममंदिर बांधायची यांच्यात हिंमत नाही असे सांगितले. आता तेच लाेक अयाेध्येला निघाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या देहू दाैऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बाेलू दिले नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या हाेत्या. यावर खाेत म्हणाले, मला या लोकांचे हसू येते. काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा, बघू तुमची दानत आहे का? मला वाटते की, महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. सुप्रिया सुळेंनी तो शपथविधी आठवावा, मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही? प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगे काय? असा टाेला खाेत यांनी लगावला.