बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारा बार्शीचा जवाहर गणेश मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:59 AM2018-09-15T10:59:34+5:302018-09-15T11:04:47+5:30
बार्शी शहराला सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक , शैक्षणिक यासह सर्वच क्षेत्रांचा मोठा वारसा.
शहाजी फुरडे-पाटील
बार्शी: शहराला सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक , शैक्षणिक यासह सर्वच क्षेत्रांचा मोठा वारसा असून, बार्शी शहरामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याची भावनादेखील पूर्वीपासूनच आहे. त्याला कोणीच अपवाद नाही. गणेशोत्सव हा एक सामाजिक एकोप्याचा सण असून, बार्शी शहरात शेकडो गणेश मंडळे वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यामध्ये तब्बल ६० वर्षे जुने असलेल्या भोसले चौकातील जवाहर गणेश तरुण मंडळाने देखाव्याबरोबरच २00 हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात पुढाकार घेतला आहे.
बार्शीच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून, पुण्यानंतर बार्शीतील गणेशोत्सव पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. या ठिकाणी भव्य ऐतिहासिक, सामाजिक व समाजप्रबोधनात्मक देखाव्याची स्पर्धाच लागलेली असते. बार्शी शहरात एकच नव्हे तर अनेक मंडळे उपक्रमशील मंडळे म्हणून पुढे येत आहेत. यामध्ये सोजर क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, योगेश क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, रोडगा रस्त्यावरील गणेश क्रीडा मंडळ, प्रसन्नदाता गणेश मंडळ यासह कितीतरी गणेश मंडळांचा उल्लेख करावा लागेल.
शहरातील कर्नल भोसले चौकातील राज-विजय क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित जवाहर गणेश तरुण मंडळाची स्थापना ही १९५१ साली चौकातील व्यापाºयांनी एकत्र येऊन केली. २००५ सालापासून चंद्रकांत उर्फ पट्टम पवार यांनी १२ वर्षांत स्त्रीभ्रूणहत्या, अमरनाथ यात्रा, वैष्णवदेवी यात्रा, अष्टदेवी दर्शन, तंटामुक्त गाव मोहीम, साईबाबा दर्शन, शेगावच्या संत गजानन महाराजांच्या मंदिराची प्रतिकृती, आदी देखावे सादर केले. देखाव्याच्या उद्घाटनासाठी प्रमुख प्रशासकीय अधिकारी व माजी आ़ राजेंद्र राऊत यांना बोलावले जाते़
- मंडळाच्या वतीने केवळ गणेशोत्सवच नव्हे तर दरवर्षी रक्तदान शिबीर घेतले जाते. मागील वर्षी पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात बसविण्यात आलेल्या सी़सी़ टी़व्ही़ कॅमेºयासाठी या मंडळाने पंचवीस हजारांची देणगी देऊन भोसले चौकातील कॅमेºयाचा खर्च उचलला आहे़ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतही केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बार्शी पोलीस स्टेशनला बेवारस मयत म्हणून नोंद होणाºया किंवा येणाºया मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सर्व जबाबदारी मंडळ गेल्या पाच वर्षांपासून पार पाडत आहे. आजअखेर १५ पेक्षा जास्त मृतदेहांवर मंडळाने अंत्यसंस्कार केले आहेत.
- माजी आ़ राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राज-विजय मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली व अभिजित राऊत आणि बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या सहकार्याने जवाहर मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली समाधान पाटील, आण्णा वाणी, नागेश लामतुरे, आण्णा सुरवसे, शिवराज खंडेलवाल, पप्पू टेकाळे, निलेश पवार,श्रीकांत राऊत, प्रवीण पवार, अर्जुन टिंंगरे, येडबा कोठावळे, चिंच गॅरेज ग्रुप हे कार्यकर्ते परिश्रम घेतात़