मंगळवेढा : श्रीनगर येथील दुर्गम भागात कर्तव्यास असणाºया मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील जवान नागप्पा सोमन्ना म्हेत्रे ह्रदयविकाराने व कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्यावर सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीनगर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागप्पाचे अखेर दर्शन घेण्यासाठी जमलेल्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
जवान नागप्पा हे लॉकडाऊननंतर २४ जून रोजी हुलजंतीमधून श्रीनगर येथे कर्तव्यावर निघाले होते, प्रारंभी ते दिल्ली येथे १४ दिवस व श्रीनगर येथे लेटपूरा येथे १४ दिवस क्वारंटाईन सेंटर मध्ये क्वारंटाईन झाले होते. या दरम्यान १८ जुलै रोजी जवानांची कोरोना टेस्ट घेण्यात आली, त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, त्याचा क्वारंटाईन कालावधी दि २५ ला संपून ते २६ जुलै ला सेवेवर जाणार होत, तत्पूर्वी त्यांना शनिवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान छातीत दुखू लागल्याने तेथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ह्दयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. पोस्टमार्टेम करण्यापूर्वी स्वॅब घेऊन त्यांची कोरोना चाचणी घेतली असता कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला़ त्यानंतर लष्कर अधिकाºयांनी कुटुंबीयांना कोरोना चाचणी मध्ये अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पार्थिव तिकडे पाठवता येत नाही तरी येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी द्या असे सांगितले, मात्र कुटुंबियांनी परवानगीसाठी नकार दिला ह्रदयविकाराच्या झटका आल्याचा रिपोर्ट व कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवा असे कुटुंबिय म्हणत होते, त्यावेळी कोरोना रिपोर्ट दाखवण्यात आला यावर कुटुंबियांचा विश्वास नव्हता.
रविवारी रात्री तहसीलदार स्वप्निल रावडे व पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी म्हेत्रे कुटुंबियांचा लष्कर अधिकारी यांच्याशी संवाद साधला़ सोमवारी अंत्यसंस्कार करतेवेळी जवान नागप्पा यांचे मुखदर्शन घडवून अंत्यसंस्कार करण्याचे ठरले, त्याप्रमाणे सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करतेवेळी व्हिडिओ कॉलद्वारे दर्शन घडविले. आता आपल्या नागप्पा चा चेहरा आपल्याला कधीच दिसणार नाही असे म्हणत पत्नी, आई, भाऊ, बहीण, चिमुकलीसह सर्वांनी आक्रोश केला. यावेळी गावकरी जवान नागप्पाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठया संख्येने जमले होते़ दरम्यान आ़ भारत भालके, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी म्हेत्रे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.