सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. सोलापुरातून भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज विजयी झाले. माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दुसºयांदा पराभव झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तिसºया क्रमांकावर राहिले आहेत. माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा पराभव केला आहे.
भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डावलून डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांना उमेदवारी दिली. महाराजांनी विरोधकांवर टीका न करता प्रचार केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार शरद बनसोडे यांची निष्क्रियता, शहराचा रखडलेला विकास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे आणि प्रकाश आंबेडकर यांची मतविभाजनाची भूमिका आदी मुद्यांवर टीका केली. पण मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेचा रोख सुशीलकुमार शिंदे यांच्यावरच अधिक राहिला.
वंचित बहुजन आघाडीने पार्क स्टेडियमवर घेतलेली जाहीर सभा लक्षवेधी ठरली होती. परंतु, तरीही ते तिसºया क्रमाकांवर राहिले. मोदी लाटेचा प्रभाव, ग्रामीण भागातून मिळालेली शिवसेनेची मदत आणि नियोजनपूर्वक काम यामुळे भाजपला यश मिळाले. भाजपने माढ्यातून संजय शिंंदे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. परंतु, शिंदे यांनी नकार दिला. यादरम्यान राष्ट्रवादीने उमेदवारी डावलल्यामुळे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे भाजपकडून रणजितदादांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फलटणच्या रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. निंबाळकरांनी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला. निंबाळकरांमुळे माढ्यातील बेरजेचे राजकारण जुळून येईल हा अंदाज खरा ठरला. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील आणखी काही नेत्यांना भाजपत आणले.
मोहिते-पाटील ठरले किंगमेकरमाढ्यासाठी जिल्ह्यातील दोन तरुण नेते दहा वर्षांपासून झगडत आहेत. त्या तुलनेत रणजितसिंह निंबाळकर हे नवखे उमेदवार होते. भाजपसाठी ही रिस्क होती. पण ही निवडणूक मोहिते-पाटील प्रतिष्ठेची करतील हा भाजपचा अंदाज खरा ठरला. मोहिते-पाटलांनी माळशिरसमधून मताधिक्य तर दिलेच. करमाळा, माढ्यातील शिंदे विरोधकांची मोट बांधली. त्यामुळे करमाळा, माढ्यातून शिंदे यांना म्हणावे तसे मताधिक्य मिळाले नाही. मोहिते-पाटील खºया अर्थाने किंगमेकर ठरले.