साेलापूर : उजनी धरणावरील नव्या याेजनेवरून निर्माण झालेला वाद राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकच गंभीरतेने घेतल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ३ जून राेजीच्या साेलापूर दाैऱ्यावर येत आहेत. या दाैऱ्यात ते महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेउन याबद्दल स्पष्टीकरण देणार असल्याचे राष्ट्रवादी नेत्यांकडून ‘लाेकमत’ला सांगण्यात आले.
उजनी धरणातून इंदापूर आणि बारामती तालुक्यातील गावांसाठी नव्या याेजनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यावरून जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. केवळ भाजपच नव्हे तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. सेना आणि काँग्रेसच्या रडावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे हेच आहेत. जिल्ह्यातील नेत्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेउन याबद्दल माहिती दिली हाेती. या भेटीत कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती हाेईल असे सांगण्यात आले हाेते.
२५ मे राेजी हसन मुश्रीफ पवारांची भेट घेणार आहेत. दरम्यान, उजनीचे पाणी वाटप आणि नवी याेजना याबद्दल जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात येईल, असे पवारांनी सांगितले हाेते. जयंत पाटील ३ मे राेजी साेलापूर दाैऱ्यात येत आहेत. या दाैऱ्यात ते जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेतील. पत्रकारांच्या माध्यमातून उजनीच्या पाणी वादावर स्पष्टीकरण देतील, असे पाटील यांच्या निकटवर्तीयांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
भरणेंबद्दलही दक्षता बाळगणार
जिल्ह्याचा पालकमंत्री बदलायच्या हालचाली सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीतील काही नेते आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी दत्तामामा भरणे यांची भेट घेतली. या वादावर मी काही बाेलणार नाही असे भरणे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले; परंतु राष्ट्रवादीतील एक गट या घडामाेडींवर नाराज असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर हे प्रकरणात विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.