सुरुवातीला पंढरपूरची पोटनिवडणूक सहजसोपी बिनविरोध होईल, असा सूर राजकीय वर्तुळात होता. मात्र, पोटनिवडणूक असूनही भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. एकास एक उमेदवार देत समाधान अवताडेंना मैदानात उतरवले आहे. महाविकास आघाडी एकसंध असल्याचे सांगितले जात असले तरी घटक पक्षातील सेनेच्या शैला गोडसे आणि स्वाभिमानीच्या सचिन शिंदे हेही निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी पंढरपुरात आले होते. नंतर अवघ्या काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: जयंत पाटील ३० मार्चला पंढरपुरात होते. आता पुन्हा तीन दिवसांतच शनिवारी पंढरपुरात येत आहेत.
कार्यकर्त्यांशी संवाद असे कारण देण्यात येत असले तरी खरे कारण बंडोबांना थंड करणे व उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावून मत विभागणी टाळणे हेच असल्याची चर्चा पंढरीत सुरू आहे.
या दौऱ्यात महाविकास आघाडीच्या बंडखोरांचे मतपरिवर्तन करतात का? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
------
भालकेंच्या बंगल्यावर बैठक
जयंत पाटील हे शनिवारी दुपारी २ वाजता दिवंगत आ. भारत भालके यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय देशमुख यांनी सांगितले आहे. बैठक कार्यकर्त्यांची असली तरी बंगल्यावर बसून ते कोणती चाल खेळतात, याबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही खलबते सुरू आहेत.