सोलापूर : पदवीधरच्या निवडणुकीनंतर मला भेटायला मुंबईला या किंवा मी सोलापुरात येईन. त्यानंतर ठरवू, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख आणि इतर नगरसेवकांना सांगितले.
पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या नियोजनासाठी पाटील रविवारी सोलापुरात होते. यादरम्या दुपारी ताज सोशल ग्रूपच्या वतीने शेख यांच्या निवासस्थानी जयंत पाटलांच्या स्वागतासाठी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, विद्या लोलगे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मनोहर सपाटे, एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी, नूतन गायकवाड, पूनम बनसोडे, तस्लीम शेख, वाहिदा शेख, शाजिया शेख, अदनान शेख, अजित बनसोडे, प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.
तौफिक शेख यांच्यासह एमआयएमचे सात नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे शेख गटातील कार्यकर्त्यांकडून गेल्या अनेक दिवसांपासून सांगितले जात आहे. यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी शेख यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली.-------यापूर्वी केल्या मागण्या : शेखपदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जयंत पाटील यांना बोलावले होते. इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. आमच्या नगरसेवकांनी प्रभागातील कामांसह इतर महत्त्वाच्या मागण्या यापूर्वीच सरकारकडे दिलेल्या आहेत. राष्ट्रवादी प्रवेश व इतर विषयांवर आताच चर्चा झालेली नाही, असे तौफिक शेख यांनी सांगितले.