कुर्डूवाडी : जीप व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलवरील पती-पत्नी जागीच ठार झाले तर जीपमधील १२ जण जखमी झाले़ यापैकी २ जण गंभीर जखमी असून, एकाला बार्शी येथे तर दुसर्याला सोलापूर येथे रवाना करण्यात आले़ ही घटना सोमवारी चारच्या सुमारास कु र्डूवाडी-करमाळा रोडवरील बुध्दविहाराजवळ घडली. डॉ.हेमंत नारायण करे (वय ३५, रा.कोंडेज, हल्ली केम) व त्यांच्या पत्नी सौदामिनी हेमंत करे हे (दोघे रा़ कुर्डूवाडी) येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेऊन दुचाकी (क्र.एमएच ४५ एल २०३२)वरुन केमकडे जात होते. तर लग्न झाल्यानंतर नेरले येथे खंडोबाचे दर्शन घेऊन जीप (क्र.एमएच १३ एझेड ९९६४)मधून १२ जण येत होते. या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर जोरदार अपघात झाला. या अपघाताची तीव्रता एवढी होती की जीपचालकाकडील एक बाजू पूर्ण तुटून गेली तर दुचाकीचा चुराडा झाला़ मोटरसायकलस्वार हेमंत करे हे काही फुटावर फेकले गेले तर त्यांच्या पत्नी सुमारे २५ फूट लांब जाऊन पडली़ यात पती-पत्नी जागीच ठार झाले.जीप झाडावर जाऊन जोरदार आदळली. अपघातस्थळी मदत या घटनेची माहिती उपनगराध्यक्ष बापूसाहेब जगताप यांनी तत्काळ पोलीस ठाण्याला दिली़ पोलीस ठाण्यातील कर्मचारी डब्ल़ूपी़सी़ कोतवाल यांनी त्वरित बिट मार्शल म्हणून नियुक्तीवर असणारे पांडुरंग मुंढे व आर.बी.आरकिले यांना माहिती दिली़ काही मिनिटातच ते घटनास्थळी गेले़ तोपर्यंत बापूसाहेब जगताप यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जखमींना रुग्णालयात नेले.
--------------------
सातच महिन्यांचा संसाऱ़़़़
मयत पती-पत्नी यांचे नुकतेच ७ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मयत डॉक्टर हेमंत नारायण करे यांचे केम येथे आयुष हॉस्पिटल आहे. पत्नी गरोदर असल्याने तिची ट्रीटमेंट कुर्डूवाडी येथील जयप्रभा हॉस्पिटल येथे सुरु होती. ट्रीटमेंट करुन हे जोडपे केम येथे जात असताना हा अपघात झाला. ४अपघातात सीमा सुरेश काळे (वय ४८), स्वाती उमाजी काळे (४५), भालचंद्र दिलीप काळे ( २५), दीक्षा उमाजी काळे (२०), अजय उमाजी काळे (२२, सर्व रा.नेरले, ता.करमाळा), ओम संतोष अंधारे (१२), साई संतोष अंधारे (७) (दोघे रा.लातूर), हर्षदा कैलास पवार (१३), श्रीधर कैलास पवार (१२), कामिना बिभीषण बागल (३५), सविता कैलास पवार (३५, रा.रोपळे ) व चालक मिलन रावसाहेब काळे (३२) हे जखमी झाले़